५३ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद : लोकसभेच्या तुलनेत मतदानात घट, प्रशासनाच्या चुकांचा मतदारांना फटकाभंडारा : जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील ५३ उमेदवारांचे भाग्य आज बुधवारला ईव्हीएममध्ये बंद झाले. आजची मतदानाची एकूण टक्केवारी ६७.२८ इतकी आहे. चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीसारखा उत्साह यावेळी मात्र जाणवला नाही. निवडणुकीच्या या रणसंग्रामात तरुण मतदारांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला असला तरी बहुतांश मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. दुपारी ३ वाजतापर्यंत ५० टक्केच्या आत मतदान झालेले होते. मोहाडी तालुक्यातील मोहोगाव (देवी), तुमसर तालुक्यातील कमकासूर, ससुरडोह आणि रामपूर येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या घटना वगळता मतदार संघातील १,१७० मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. तुमसर विधानसभा क्षेत्रात १३, भंडारा विधानसभा क्षेत्रात १९ तर साकोली विधानसभा क्षेत्रात २१ उमेदवार रिंगणात आहेत. आज बुधवारला या सर्व ५३ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही. सकाळी ९ वाजतानंतर काही केंद्रांमध्ये रांगा दिसून आल्या. मतदान शांततेत व्हावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाऊस असल्यामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दुपारी २ वाजताच्या सुमारास महिलांची संख्या अधिक दिसत होती. ग्रामीण भागात कोण निवडून येईल, याच चर्चांना ऊत आले होते. पावसामुळे दुपारी ३ वाजता गांधी विद्यालयात मतदारच नव्हते. त्यामुळे मतदान केंद्रातील अधिकारी टक्केवारीची जुळवाजुळव करीत होते. या केंद्रावर दुपारी ३ वाजता ३५ टक्केच्या आत मतदान झाले होते. अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी ४ नंतर गर्दी वाढू लागली. मतदानाचा अवधी सायंकाळी ६ वाजतापर्यंत असल्याने वृद्ध मतदार सायंकाळी घराबाहेर निघणे पसंत केले. शहरातही निरुत्साहभंडारा शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांचा निरुत्साह दिसून आला. पवनी तालुक्यातील तीन मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने दीड तास मतदानादरम्यान व्यत्यय आला. दुसऱ्या ईव्हीएम लावल्यानंतर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. नावासाठी शोधाशोधभंडारा व पवनी विधानसभा क्षेत्रातील बऱ्याच मतदारांना निवडणूक विभागातर्फे देण्यात येणारे मतदानपत्र घरपोच पोहचले नाही. परिणामी, बहुतांश मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना खूप वेळेपर्यंत मतदार यादीतील नावे शोधावी लागली. अनेकांना त्यांची नावे न सापडल्यामुळे आल्यापावली परतावे लागले. महिला आघाडीवरचुल आणि मूल या परंपरागत संकल्पनेला तडा देऊन महिलांनी मतदानाच्या प्रक्रियेत हिरीरीने सहभाग नोंदविला. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या चार लाखांच्यावर आहे. मतदान केंद्रांवर महिला मतदारांची गर्दी दिसून आली. अनेक केंद्रांवर महिलांची वेगळी रांग लागलेली होती. त्यामुळे महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. नवमतदार उत्साहीबहुतांश नवमतदारांमध्ये निवडणुकीसंदर्भात उत्साहाचे वातावरण दिसले. पहिल्यांदा मतदान करण्याचा आनंद असला तरी आपण निवडून दिलेला प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थापन प्रणालीचा भाग बनणार आहे, हीच बाब त्यांच्यासाठी गौरवाची वाटत होती. मतदानाचा हक्क घटनेने दिला असल्यामुळे मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्याचे तरुणांनी सांगितले. ५,६४० कर्मचाऱ्यांनी बजावले कर्तव्यभंडारा जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील १,१७० मतदान केंद्रांवर ५,६४० कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यात १,१७० केंद्राध्यक्ष असून तुमसर क्षेत्रासाठी १,५४४, भंडारा क्षेत्रासाठी २,४६४ तर साकोली क्षेत्रासाठी १,६३२ कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आलेली होती.जिल्ह्यात चार हजार पोलिसांचा बंदोबस्तनिवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पॅरामिल्ट्री फोर्स व एसआरपीएफच्या ४ कंपन्या, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, २० पोलीस निरीक्षक, १२९ पोलीस उपनिरीक्षक, २ हजार १५१ पोलीस कर्मचारी, ६५० गृहरक्षक दलाचे कर्मचारी असे एकूण चार हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात ६७.२८ टक्के मतदान
By admin | Updated: October 15, 2014 23:14 IST