वैनगंगेत मुबलक जलसाठा
भंडारा : जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणार्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३४़०३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात १७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़
सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ३२़८०, बघेडा ७१़७०, बेटेकर ४१, सोरना जलाशयात ३१ टक्के जलसाठा आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३१़८८ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ३२.९७ टक्के आहे़ ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखल पहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ४१़६३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ ५ मे रोजी ६३ प्रकल्पात १७़२४९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी १४़१७ एवढी होती. जनावरांसह वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. (नगर प्रतिनिधी)