भंडारा : मोहाडी, लाखनी व लाखांदूर या तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे आता २७१ उमेदवार रिंगणात आहेत. यात मोहाडीत ९९, लाखनीत ७३ तर लाखांदुरात ९९ उमेदवार निवडणूक लढणार आहेत. नामांकन मागे घेण्याच्या दिवशी तिन्ही ठिकाणी गर्दी दिसून आली.१७ जागा १७ मतदान केंद्रमोहाडी, लाखनी आणि लाखांदूर नगर पंचायतीमध्ये प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. या तिन्ही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने सर्वच १७ ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. शिवसेना, बसपा आणि काही ठिकाणी स्थानिक आघाडीने आपले उमेदवारांना रिंगणात उभे केले आहेत.प्रचारासाठी १० दिवस १९ आॅक्टोबर रोजी नामांकन मागे घेण्याची तारीख होती. २० रोजी उमेदवारांना चिन्ह मिळणार आहे. सोबतच रिंगणातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे या उमेदवारांना प्रचारासाठी २० आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर असा दहा दिवसाचा कालावधी मिळणार आहे. २५ हजार २६२ मतदार या तिन्ही नगर पंचायतमध्ये २५,२६२ मतदार असून १२,७१७ पुरुष मतदार तर १२,५४५ महिला मतदार आहेत. मोहाडीत ४,०२५ पुरुष मतदार तर ३,८५४ महिला मतदार, लाखनीत ५,१६५ पुरुष मतदार तर ५,१२९ महिला मतदार तर लाखांदूरमध्ये ३,५२७ पुरुष मतदार तर ३,५६२ महिला मतदार मतदार आहेत. चुरशीच्या लढती तिन्ही तालुक्यातील प्रत्येक १७ जागांच्या निवडणूक लढती या चुरशीच्या होणार आहेत. प्रत्येक वॉर्डात प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत चुरस अधिक आहे. (लोकमत चमू)
तीन नगरपंचायतीत २७१ उमेदवार रिंगणात
By admin | Updated: October 20, 2015 00:36 IST