लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्यातील मौजा देव्हाडी येथील औषध निर्मिती करणाऱ्या क्लेरियन कंपनीत २२ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या रासायनिक अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुपरवायझरचा उपचारादरम्यान शनिवारी दुपारी मृत्यू झाला. यामुळे कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून कामगारांनी आंदोलन सुरू कलेले आहे. परिणामत: दोन दिवसांपासून कारखान्याचे उत्पादन ठप्प आहे.
सुनील दमाहे (३२, रा. देव्हाडी) या कामगाराचा दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याने आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप आहे. सुरक्षेच्या उपायोजना, ॲम्बुलन्स सेवा व वेतन वाढ करण्याची मागणी आदींसह अनेक मागण्या कामगारांनी मांडल्या आहेत.