शिवसेना, भाजप उमेदवारांचाही समावेश मोहाडी : नगरपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्च ३० दिवसांच्या आंत सादर करणे बंधनकारक असताना सुद्धा मोहाडी येथील पराभूत २४ उमेदवारांनी अद्यापपर्यंत निवडणूक खर्च सादर केलेला नाही. यात शिवसेना, भाजप सारख्या पक्षाचे उमेदवार सुद्धा आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येकच उमेदवाराला ३० दिवसाच्या आत निवडणूक खर्च संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सादर न करणाऱ्या उमेदवाराला सदस्यत्व रद्द तसेच सहा वर्षापर्यंत निवडणूक लढविण्यावर निर्बंध घालण्याचा प्रावधान आहे. निवडणूक खर्च सादर न करणाऱ्यामध्ये अॅड. नंदकिशोर गायधने, भाजपाचे माजी ग्रामपंचायत सदस्य रफीक सैय्यद, भाजपाच्याच संगीता युवराज बारई, राष्ट्रवादीचे माजी ग्रामपंचायत सदस्य ओमकार पवारे हे प्रमुख उमेदवार आहेत. अॅड. नंदकिशोर गायधने यांना या निवडणुकीत शुन्य मते मिळाली होती हे उल्लेखनिय. याशिवाय रविंद्र उदाराम थोटे, ममता महिपाल बावणे यांना सुद्धा शुन्य मते प्राप्त झाली होती तर राजा प्रभाकरराव रणदिवे यांना फक्त एकच मत प्राप्त झाले होते.अपक्ष १२, शिवसेना ६, मनसे २, भाजपाचे २, राष्ट्रवादीचे २ अशा २४ उमेदवारांनी २५ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक खर्च सादर केलेला नव्हता. त्यांना निवडणूक आयोगातर्फे दोनदा नोटीसीही पाठविण्यात आल्या होत्या. त्या २४ उमेदवारांनी खर्च सादर करण्याची तहदीक घेतली नाही. आता खर्च सादर करण्यासाठी फक्त सहा दिवस उरलेले असून जर एखाद्याने खर्च सादर करण्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढविण्यावर बंदी घातली जाणार हे निश्चित आहे. या उमेदवारांवर कोणती कारपाई होईल, याकडे अनेकांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)
२४ उमेदवारांनी खर्च सादर केलाच नाही
By admin | Updated: November 26, 2015 00:41 IST