भंडारा : तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली आहे. प्रलंबित वेतन १ जुलैपर्यंत अदा करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा इशारा प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.पंचायत समिती भंडारा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित होते. प्रलंबित वेतन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नाने दि. २२ जून २०१४ ला अदा करण्यात आले. परंतु शालार्थ वेतन प्रणालीचे कारण दाखवून निवडक २३ शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन अदा करण्यात आले नाही. खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक संघाने अनेकदा चर्चा केली. सदर शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येत नसल्यामुळे शिक्षकांच्या पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली असून शिक्षकांची मानसिक स्थिती बिघडली आहे.२३ शिक्षकांच्या प्रलंबित वेतन १ जुलै पर्यंत अदा न केल्यास प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा भंडाराच्या वतीने दि. ५ जुलैला धरणे आंदोलन व दि. ६ जुलैपासून पंचायत समितीचे कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर २३ शिक्षकांपैकी सर्वजण शासकीय कर्तव्यावर असून वेतन मिळत नसल्याचा धसका घेऊन जिल्हा प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. माहे एप्रिल व वेतन अदा न झाल्यामुळे त्यांची पेंशन केस तयार होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळण्याकरिता शिक्षक नेते दिलीप बावनकर, दिलीप बागडे अध्यक्ष, प्रभू तिघरे सरचिटणीस, वामन ठवकर, रमेश मदारकर, नामदेव गभणे, अशोक भुरे, प्रमोद कळंबे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
२३ शिक्षकांचे वेतन अडले
By admin | Updated: June 29, 2014 23:48 IST