मुख्यमंत्र्यांना निवेदन : समस्या निकाली काढण्याची मागणीभंडारा : गोसीखुर्द प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील सुरेवाडा गावाचे अर्धवट पुनर्वसन करण्यात आले आहे. अनेक कुटुंबांना भुखंड मिळाले नाही. तसेच पॅकेजचा लाभही देण्यात आला नाही. परिणामी येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबाची ससेहोलपट होत आहे. पुनर्वसित नवीन गावठाणात घेण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.भंडारा तालुक्यातील सुरेवाडा हे वैनगंगा नदीकाठावरील गाव गोसे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात आहे. या गावाचे पुनर्वसन माटोरा नजीकच्या गावठाणात करण्यात आल्या. सुरेवाडा येथील ७० कुटुंब नवीन गावठाणात स्थानांतरित झाले तथापि बांधित सुरेवाडा येथील १३१ कुटुंबाना पॅकेजचा लाभ मिळाला नाही. तसेच त्यांना नवीन गावठाणात भूखंड देण्यात आले नाही. परिणामी या कुटुंबातील सदस्यांनी अद्यापही गाव सोडले नाही. बाधित गाव नदीकाठावर आहे. वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. गावातील काही जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. पॅकेजचा लाभ मिळाला नसल्याने प्रकल्पग्रस्त घराचे बांधकाम करू शकत नाही. भूखंड आणि पॅकेजचा लाभ मिळावा, यासाठी बाधित सुरेवाडा येथील संबंधित प्रकल्पग्रस्त सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असले तरी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, पुनर्वसित सुरेवाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचयतींची घोषणा करण्यात आली आहे. सद्यस्थितीत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बाधित गावातील प्रकल्पग्रस्तांना भूखंड व पॅकेजचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार घालून तीव्र आंदोलनाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले.निवेदनावर सुरेश पवनकर, नरेंद्र सुखदेवे, मनोहर उके, सुनील मेश्राम, भाऊराव उके, हरिभाऊ खोब्रागडे, राजेंद्र पवनकर, नंदू कुठे, किसन वरवाडे, महादेव आंबाघरे, अजय खोब्रागडे, दीपक महालगावे, सुरेश खोब्रागडे, अभिमन शेंडे, सुमन खोब्रागडे, पारबता मडामे, सिंधू खोब्रागडे, पुस्तकला मडामे, बालचंद मडामे, प्रल्हाद खोब्रागडे, गीता शहारे, केवळराम नागपुरे, विष्णू शेंडे, राजेश उके, मीरा मेश्राम, पिंटू नागपुरे, मारोती उके यांच्यासह १२६ प्रकल्पग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)
१३१ प्रकल्पग्रस्त उघड्यावर
By admin | Updated: October 25, 2015 00:39 IST