नागरिक त्रस्त : कोंढा परिसरातील प्रकारकोंढा कोसरा : वीज पारेषण कंपनीतर्फे कोंढा परिसरात थ्री फेज पुरवठा अंतर्गत आठवड्यातून चार दिवस १२ तासांचे भारनियमन सुरु आहे. त्यामुळे कृषी पंप, राईस मिल व लहान-मोठ्या उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम होत आहे. गावातील लोकांना भारनियमनामुळे नळयोजनेद्वारे पाणी मिळणे कठीण झाले आहे.शेतकरी कृषी पंपाद्वारे सध्या रबी पिक घेते. अनेकांचे १३५ दिवसांचे धान निसवत आहे. अशावेळी पाण्याची गरज असते. राईसमिल, आटामशीन, नळयोजना, मोठे यंत्र थ्री फेस लाईनवर चालतात. पण सध्या सप्ताहात चार दिवस दिवसाकाठी १२ तासांचे भारनियमन सुरु आहे. सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत थ्री फेज लाईन नसल्याने शेती, उद्योग प्रभावित झाले असून शेतकरी हवालदिल त्रस्त झाले आहेत. शुक्रवार ते रविवार तीन दिवस सकाळी १०.४५ ते ५.४५ पर्यंत फक्त थ्री फेज वीज पुरवठा असतो. अशावेळी राईसमिल, सॉ मिल चालविणाऱ्यांपुढे, केव्हा काम करावे असा प्रश्न पडला आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनांना देखील भारनियमनाचा फटका बसला आहे. याबद्दल शेतकरी देखील गप्प होत आहे. कोंढा, कोसरा, सेंद्री (खु), सेंद्री बु., भावड, पिंपळगाव (नि.), आकोट, पालोरा (चौ.), लोणारा, कुर्झा, आकोट, चिचाळ, गोसे (बु.), गोसे खुर्द या गावातील शेतीला कोंढा येथील उपकेंद्रातूनच वीज पुरवठा केला जाते. त्यामुळे वीज आहे पण नसल्यासारखीच स्थिती आहे. रात्रीला थ्री फेज लाईन असते. पण अनेक वीज पुरवठा खंडीत केला जाते. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला शेतावर जावे लागते. विजेचा लपंडाव सर्वांना त्रास देणारा आहे. सिंगल फेज लाईन देखील अनेकदा जाते आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. विजेवर आधारीत उद्योगांमध्ये राईसमिल, सॉ मिल, नळयोजना योग्य काम करीत नाही. तरी लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी राईस मिल, सॉ मिल चालविणाऱ्या लोकांची आहे. तसेच वीज पारेषण कंपनीने दररोज दिवसातून किमान चार तास थ्री फेज लाईनचा पुरवठा करण्याची मागणी शेतकरी लघुव्यवसायीकांनी केली आहे. याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
१२ तासांचे भारनियमन
By admin | Updated: November 4, 2014 22:34 IST