भंडारा : एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा जिल्हा (७२.२१ टक्के) मतदानाच्या टक्केवारीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यावेळी विधानसभा निवडणुकीत पहिला यावा, यासाठी आयोगाच्या सुचनांनुसार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गावांगावात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी डॉ.खोडे म्हणाल्या, मतदारांना जागृत करण्यासाठी २९ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत शाळांमध्ये तर १ ते १० आॅक्टोबर या कालावधीत महाविद्यालयामध्ये प्रतिज्ञापत्रांचे वाचन करण्यात येणार आहे. मतदारांसाठी तयार करण्यात आलेली संकल्पपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात आले असून कुटूंबातील मतदारांच्या स्वाक्षरीचे संकल्पपत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेण्यात येणार आहे. २ ते ८ आॅक्टोबर रोजी शालेयस्तरावर तर २ आॅक्टोबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येईल. ३० सप्टेंबर रोजी महाविद्यालयामध्ये मतदार जनजागृती या विषयावर रांगोळी स्पर्धा, १ आॅक्टोबर रोजी ‘जागृत मतदार व लोकशाहीचे बळकटीकरण’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोेजित करण्यात आलेली आहे. याशिवाय मतदारांना जागृत करण्यासाठी ५ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत शाळा स्तरावर पालक सभा घेण्यात येणार आहेत. कमी मतदानाची टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रावर उपविभागीय अधिकारी यांच्या बरोबर संपर्क साधून ६ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत ११७ मतदान केंद्रांवर कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.भंडारा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत २ आॅक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता लोकशाही दौड रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅलीचा गांधी चौकातून प्रारंभ होईल. दि.२ आॅक्टोबर गांधी जयंतीदिनी विशेष ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. त्या दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे मतदारांसाठी असलेले आवाहनपत्र वाचून दाखविण्यात येणार आहे. आंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि बचतगट यांच्या सभा जिल्हा आरोग्य अधिकारी व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी सभेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय स्वस्त धान्य दुकानात पोष्टर लावण्याच्या सूचना तहसील कार्यालयांना देण्यात आलेले आहे. नगर पालिका क्षेत्रात प्रभात फेरी व ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्याच्या सूचना भंडारा, तुमसर व पवनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे मंडळांना देण्यात आलेले आहे. आरतीच्यावेळी मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाण, रेल्वे स्थानक, बस स्थानक, सर्व बँकामध्ये पोस्टर तर आॅटो आणि बसेसवर बॅनर्स लावण्यात आले आहेत. सर्व गटनिहाय अधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली असून मतदारांच्या घरी जावून मतदान पत्रिका देण्यात आली असून संबधित मतदार केंद्रावर सभा घेऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कमी मतदानाची टक्केवारी असलेल्या ११७ मतदान केंद्रांची टक्केवारी वाढविण्यासाठी ११ नोडल अधिकारी नियुक्त केले असून संबंधित मतदान केंद्रावर जावून गटनिहाय अधिकाऱ्यांशी चर्चा, सभा, रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सिनेमागृह आणि केबलवर माहिती देण्यात येत असून रेल्वे व बस स्थानकावर मतदान आवाहनासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. घरगुती गॅस बिलावर आणि पाणी पट्टी बिलावर मतदान जनजागृतीसंबंधी आवाहन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवडणूक अधिकारी मिलिंद बन्सोड, तुमसरचे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, विजय देवळीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
१०० टक्के मतदान भंडाऱ्याची शान
By admin | Updated: September 29, 2014 00:38 IST