सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. आनंदाचे दिवस निघून जातात पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण होते. सुख मलाच का दिलेस हे आपण देवाला विचारत नाही, मात्र माझ्याच वाट्याला दुःख का दिलेस असा देवाला जाब विचारतो. देव मदत करत नाही म्हणून त्यालाच बोल लावतो. त्याऐवजी आहे ती स्थिती स्वीकारून संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागायची. स्वामी सांगतात, 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!' एवढा मोठा दिलासा असतानाडगमगण्याची गरज नाही. त्याऐवजी पुढील प्रार्थना आपल्या रोजच्या उपासनेत समाविष्ट करा. केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणा, त्यामुळे मन स्थिर, शांत होईल. विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल. अशा स्थितीत स्वामींना विनंती करा -
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहूउकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।।
निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊहृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहूबोधुनि दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ ॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसा राहूकरी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥
अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहूनिरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू ॥
स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हे गुपित कायम लक्षात ठेवा. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत, आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे. जो ही सूत्री सांभाळतो, भगवंत त्याचे रक्षण करतो.
त्यामुळे संकटकाळात उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला, स्वामी निश्चित मदत करतील!
श्री स्वामी समर्थ!