Margashirsha Sankashti Chaturthi December 2024: मराठी वर्षातील सर्वोत्तम मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना म्हणूनही सांगितला जातो. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. याच मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी १८ डिसेंबर २०२४ रोजी आहे. सन २०२४ मधील ही शेवटची संकष्ट चतुर्थी असून, व्रताचरण कसे करावे? प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ काय? जाणून घेऊया...
गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी गणपतीच्या पूजेसह श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीचे विशेष पूजन करावे. नामस्मरण, स्तोत्र पठण, मंत्र जप करावा, असे सांगितले जाते. असे केल्याने गणेशासह लक्ष्मी नारायणाचेही शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील, असे म्हटले जाते.
चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.
बाप्पााला एक गोष्ट अर्पण करा; पुण्यफल, अपार लाभ मिळवा
संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी बुधवारी येणे हेही विशेष मानले गेले आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
अहमदनगर (अहिल्यानगर) | रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे |
बीड | रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे |
सांगली | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) | रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०८ वाजता ४६ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून ३० मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून २६ मिनिटे |