Mahashivratri 2025 Shiv Manas Puja: बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. या दिवशी संपूर्ण देशभरातील शिव मंदिरात जाऊन भाविक जलाभिषेक, रुद्राभिषेक, विशेष शिवपूजन, उपासना, मंत्रांचे जप करत असतात.
महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम्, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर इ.असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी माघ वद्य चतुर्दशी सुरू होत आहे. तर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ०८ वाजून ५४ मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु, महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री शिवपूजन करावे, असे सांगितले जात आहे. महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. प्रत्येक प्रांतानुसार त्या-त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. मराठी वर्षांत महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे.
अगदी काही मिनिटांत होते ‘शिव मानस पूजा’
आजचे जीवन अतिशय धकाधकीचे झाले आहे. सण-उत्सव, व्रत-वैकल्ये असली की धावपळ होते. बिझी शेड्युलमुळे अनेकांना इच्छा असूनही महाशिवरात्रीचे व्रत करणे शक्य होत नाही. अनेकांच्या मनात महाशिवरात्रीचे व्रत करावे, मंदिरात जाऊन दर्शन घ्यावेत, शिवाचे शुभाशिर्वाद घ्यावे, यथाशक्ती पूजन करावे, असे कायम येत असते. मात्र, अनेक व्यवधानांमुळे ते शक्य होतेच असे नाही. धावपळीच्या जीवनात परमार्थ, पूजापाठ करायला अनेकांना वेळ मिळत नाही. अशावेळेस मानस पूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय आहे. घरच्या घरी अगदी काही मिनिटांत शिव मानस पूजा करता येऊ शकते.
मानस पूजा म्हणजे काय? मानस पूजन कसे करावे?
मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानस पूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्ट देवताचे स्वरुप आपल्या मन:पटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, म्हणजे मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी, असे सांगितले जाते. आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो, तेव्हा षोडोपचारे पूजा करतो, म्हणजे आसन, अर्ध्य, पुष्प, गंध, धूप, दिप असे सोळा उपचार पूजा करताना वापरतो. मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरली जातात. आदि शंकराचार्य यांचे ‘शिव मानस पूजा’ स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्यात भगवान शंकराची मानस पूजा केली आहे.
शिव मानस पूजा स्तोत्र
रत्नै: कल्पितमासनं हिम-जलै: स्नानं च दिव्याम्बरंनाना-रत्न-विभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनं ।जाती-चम्पक-बिल्व-पत्र-रचितं पुष्पं च धूपं तथा,दीपं देव दयानिधे पशुपते हृत-कल्पितं गृह्यताम् ||१||
सौवर्णे नव-रत्न-खंड-रचिते पात्रे घृतं पायसं,भक्ष्यं पञ्च-विधं पयो-दधि-युतं रम्भाफलं पानकं ।शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूर-खंडोज्ज्वलं ,ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ! ||२||
छत्रं चामरयो:युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं ,वीणा-भेरि-मृदंग-काहलकला गीतं च नृत्यं तथा ।साष्ट-अंगं प्रणति: स्तुति: बहुविधा ह्येतत्समस्तं मया,संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ! ||३||
आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं ,पूजा ते विषयोपभोग-रचना निद्रा समाधि-स्थिति: ।संचार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्रानि सर्वागिरो ,यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं ||४||
कर-चरण-कृतं वाक्कायजं कर्मजं वा,श्रवण-नयनजं वा मानसं वापराधं ।विहितमविहितं वा सर्वमेतत्-क्षमस्व ,जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ! ||५ ||
संस्कृतमध्ये म्हणणे शक्य नाही? मराठीत शिव मानस पूजा म्हणा
श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनीमनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणीदिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळतेकस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहतेपापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांचीकितीक सुंदर अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याचीस्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||१||
सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटीदह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठीरसाळ भाज्या मधूर पाणी गोड फळे स्वामी सेवावीभोजनोत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुखशुद्धी व्हावीमानसीच्या विश्रामगृही प्रभू आता तव होऊ दे आगमन ||२||
मस्तकी धरतो छत्र सुलक्षण चवरीने तुज वारा घालीनस्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरतीस्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरतीपुन:पुन: तुज नमितो येथे स्तवनांनी लववितो वैखरीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||३||
तू आत्मा मम , बुद्धीरुपाने देवी उमा अंतरी विराजेप्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजेविषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती तीनिद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थितीपायांना जी घडे भ्रमंती तुझी कृपाळा ती प्रदक्षिणावाचेला स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे हे दयाघनाया देहातून या मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता ||४||
मी जे कर्म करावे ते ते तव आराधन हो प्रभुनाथाया हातांनी , या चरणांनी , या वाणीने , या कर्णांनीया कायेने अनुचित कर्मे जी आचरिली पूर्ण जीवनीहे करुणाकर ! महादेव हे ! अपराधांना प्रभू क्षमा करीनमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||५ ||
||ॐ नमः शिवाय||
|| हर हर महादेव ||