Magh Sankashti Chaturthi February 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भीष्मद्वादशी असे सण येतात. माघ पौर्णिमा, गुरुप्रतिपदा यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. काही ठिकाणी या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे आचरले जाते. फेब्रुवारी महिन्यातील माघ संकष्ट चतुर्थी व्रत कसे करावे? प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा काय? जाणून घेऊया...
माघ महिन्यात वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ०५ वाजून १६ मिनिटे ते सकाळी ०६ वाजून ०७ मिनिटांपर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून २८ मिनिटे ते ०३ वाजून १२ मिनिटे आहे. गोधुली मुहूर्त सायंकाळी ०६ वाजून १० मिनिटे ते रात्री ०७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत आहे. तर अमृत काल रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे ते ११ वाजून ३६ मिनिटे आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग जुळून येत आहेत.
संकष्ट चतुर्थी व्रताचे महत्त्व अन् महात्म्य
विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.
माघ संकष्ट चतुर्थीचे व्रतपूजन कसे करावे? पाहा, सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात.
गणेश पूजनात दुर्वा अवश्य अर्पण करावी
गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
अहिल्यानगर | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ३८ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे |
धाराशीव | रात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे |
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||