शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

लागली समाधी ज्ञानेशाची; इंद्रायणी काठी आळंदी यात्रेचे ७२४ वे वर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 14:27 IST

कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली. त्याला ७२४ वर्षे पूर्ण झाली. तरीदेखील विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर यांच्या भेटीसाठी आजही आळंदीची यात्रा लोटते आणि पंढरपुरच्या पांडुरंगाच्या पादुका पालखीतून माउलींच्या भेटीसाठी इंद्रायणी काठी आणल्या जातात. 

कार्तिक वद्य त्रयोदशी. याच दिवशी महाराष्ट्रात आळंदीक्षेत्री भरदुपारी घडलेल्या घटनेने सूर्यदेखील क्षणभर स्तब्ध झाला. इंद्रायणीचे पाणीही थांबले. या घटनेचे जे साक्षीदार होते, त्यांना शोकावेग आवरत नव्हता. सगळे चराचर सुन्न झाले होते. ज्याच्या वियोगाच्या कल्पनेने व्याकुळ होऊन दु:खसागरात लोटले गेले होते, तो २२ वर्षांचा तरुण मुलगा, एक महायोगी. ऐहिकाचा त्याग करून चिरंतनाच्या प्रवासाला निघाला होता. या तरुण महायोग्याच्या हिशोबी हा इहलोक, तो परलोक असे काही नव्हतेच. सगळे जग, सर्व काळ त्याच्या लेखी सारखेच होते. डोळ्यांना जे दिसते किंवा डोळ्यांना जे दिसू शकत नाही, हे त्याच्यासाठी समान होते. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये, अशी सुंदर शब्दरचना करणारा, भगवद्गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरीतून ज्ञानामृत पाजणारा, असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेला तत्त्वज्ञ, ज्ञानियांचा राजा अर्थात संत ज्ञानेश्वर, सर्व संतांची ज्ञानोबा माऊली यांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला संजीवन समाधी घेतली. केवळ बावीस वर्षाचे कोवळे वय, परंतु आपले अवतार कार्य संपवून या ज्ञानयोग्याने इहलोकीची यात्रा संपवली. त्यावेळी अखिल चराचराला जे दु:खं झाले, ते दु:खं, कविवर्य बा.भ. बोरकरांनी आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे.

हेही वाचा : तुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा!; माऊलींची माऊलीने काढलेली समजूत.

ज्ञानदेव गेले तेव्हा, तडा विटे गेला,बापरखुमादेविवरु, कटीत वाकला।ज्ञानदेव गेले तेव्हा, बापुडला नामा,लागोपाठ भावंडे, ती गेली निजधामा।माझ्या ज्ञानराजा, ते रे कळो आले आज,भरदुपारी ही तशी झाली तीनसांज।तेव्हाच्यासारखा पुन्हा बावला मोगरा,भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।इथे आळंदीत आता ऊर फाटे, पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे।कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फास,एकाकी प्रवास आता, उदास उदास।

कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली. त्याला ७२४ वर्षे पूर्ण झाली. तरीदेखील विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर यांच्या भेटीसाठी आजही आळंदीची यात्रा लोटते आणि पंढरपुरच्या पांडुरंगाच्या पादुका पालखीतून माउलींच्या भेटीसाठी इंद्रायणी काठी आणल्या जातात. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, आळंदीतील कार्तिकी वारीकरिता पंढरपुरातून येणाऱ्या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत प्रवेश असणार आहे. तसेच ६ ते १५ डिसेंबरपर्यंत आळंदी व पंचक्रोशीत संचारबंदी लागू करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सर्व वारकऱ्यांना माउलींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेता येणार नाही. तसे असले, तरी बापरखुमादेवीच्या लाडक्या, तसेच तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या ज्ञानोबाचे स्मरण करून, तसेच त्यांनी दिलेले विचार अंगीकारून आपल्याला राहत्या जागीदेखील, मानसपूजेतून आळंदी यात्रा पार पाडता येईल. 

ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, ती वैफल्यातून नव्हे, कारण ते मूर्तिमंत साफल्य हात जोडून उभे होते. त्यांच्या वयाचे तरुण आयुष्याला कंटाळून जीवनाचा त्याग करतात. मात्र, ज्ञानेश्वरांनी जीवनातील प्रतिकुलता संपवून अनुकूलतेची सुरुवात होण्याआधी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. प्रकाशवैभवाकडे निग्रहाने पाठ फिरवली. आयुष्यात कुठे थांबावे आणि आयुष्य सार्थकी लावून समाधानाने जगाचा निरोप कसा घ्यावा, याचा आदर्श परिपाठ त्यांनी घालून दिला. त्यांनी जनमानसात लावलेला ज्ञानरूपी मोगरा ७२४ वर्षांनी देखील दरवळत आहे, हिच त्यांच्या कार्याची पावती. आळंदी यात्रेचे प्रयोजन लक्षात घेता, आपणही आपल्या मनात आणि जनात सत्कार्याचा दरवळ पसरवण्याचा प्रयत्न करूया.

हेही वाचा : हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी!- आशोंची बोधकथा!