Datta Jayanti: कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन:। द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ:॥ भरतवर्षाला परकीय आक्रमण आणि आक्रमकांचा फार मोठा इतिहास आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक स्तरांवर ही आक्रमणे विनाशकारी अशीच ठरली. आक्रमणे, लढाया, युद्धे यांमुळे समाजमन अगदी ढवळून निघाले होते. परकीय आक्रमणातही संस्कृती, परंपरा टिकवून ठेवण्याचे, समाजाला सातत्याने नवचैतन्य देण्याचे काम संत परंपरा तसेच अनेक संप्रदायांनी केले. यापैकी एक म्हणजे दत्त संप्रदाय. दत्तात्रेय देवता, देवतेचे स्वरुप आणि परंपरा पाहिल्यानंतर आता दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया...
BLOG: अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनादिकालाचे पूजनीय दैवत, भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त!
भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ या अवताराचे कार्य केवळ तीस वर्षांचे आहे. परंतु, या काळात केलेल्या लीला, लोकोद्धार आणि समाजभान टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य झालेले पाहायला मिळते. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला झाला. गणेश चतुर्थीला झाला. पीठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्यरूप असे होते, पायात दिव्य खडावा, कटीला कौपिन व मेखला, अंगावर काशाय वस्त्र हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळी भस्म, व मस्तकी जटाजुट धारण केलेली, कमळा प्रमाणे प्रफुल्ल लोचनांची व मंद स्मितयुक्त चंद्रतुल्य मदन मनोहर वदनाची! श्रीपाद प्रभूंची दया, क्षमा शमद मालांकृत भव्य मूर्ती अवलोकन करणारे सर्व लोक धन्य होत! ते कृष्णामाईत त्रिकाल स्नान करीत असत. रोज प्रातःकाळी संध्येत १००० गायत्री जपत तर सूर्यनारायणास १०८ नमस्कार घालीत, असे म्हटले जाते.
समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचे भारत भ्रमण
आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदांत प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दुष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिल्याचे सांगितले जाते.
श्रीपादांचे अवतारकार्य महान असून अवर्णनीय
पीठापूर व कुरवपूर ही दोन्ही क्षेत्रे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चैतन्याने परमपवित्र झालेली आहेत. या दोन्ही ठिकाणी त्यांनी दुःखी-कष्टी जीवांचा उद्धार केला. त्यांची दुःखे, व्याधी, पापे त्यांनी आपल्या दिव्य व अगम्य अशा नाना प्रकारच्या लीलांनी दूर केली. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांचे हे महान कार्य चालू होते. त्यांच्या परिवारातील सर्वांनाच त्यांच्या अद्भूत लीलांनी विस्मयचकित केले होते. अनेक प्रसंगी ते स्वतःच दत्तगुरू असल्याची प्रचिती त्यांनी लोकांना दाखविली आहे. प्रभू वयाच्या सोळा वर्षापर्यंत पीठापूर येथे वास्तव्यास होते. त्यानंतर आपल्या भक्तांची हाक ऐकून ते घराबाहेर पडले. ह्या घटनेचे भाकीत त्यांनी आपल्या माता व पिता यांचेजवळ बालवयातच सांगितले होते. पीठापूर येथून ते थेट कुरवपूर येथे आले. कुरवपूर येथे त्यांनी चौदा वर्षे राहून जनसेवा केली. श्रीपाद श्रीवल्लभांचे संपूर्ण चरित्र म्हणजे एक सजीव चैतन्य श्रुति आहे. श्रीपादांचे अवतारकार्य महान असून अवर्णनीय असे आहे. श्रीपादांचे पुढील पूर्णावतार नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ आहेत. हे अवतार महाराष्ट्रात झालेले असून ते सर्वांना परिचित आहेत. श्री साईनाथ हा त्यांचाच झालेला अंशावतार आहे. महाराष्ट्रात झालेले अनेक अवतार उदा. गजानन महाराज, श्रीरामदासस्वामी, श्री गाडगे महाराज, अशा झालेल्या महान अवतारांचे भाकीत श्रीपादांनी त्या काळात केलेले आढळते. हे अवतार कोणत्या स्थळी, कोणत्या काळी होतील, शिवाय अवतार घेणारे कोणते पुण्यवान गृहस्थ, त्यांच्यासमयीन होते, ह्याचा त्यांनी तेव्हा उल्लेख केलेला आहे. ही चराचर सृष्टी परमात्मास्वरूप आहे. धर्मरक्षा क्रमात, कृतयुगात जनार्दन, त्रेतायुगात रघुनंदन, द्वापारयुगात बलराम-कृष्ण तर कलियुगात श्रीपाद वल्लभ, यांच्या ह्या अवताराच्या भविष्यवाणीचा उल्लेख पुराणात वेदव्यासांनी केलेला आढळतो.
श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वचन
श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा बालस्वरुपातील अवतार असल्याचे म्हटले जाते. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. श्रीदत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्रीदत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिर्वाय असते. स्मरण, अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन, कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये'
श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पाऊले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे. त्या पद्मावर श्रीपादांच्या पावलांचे चिन्ह उमटत असे. ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेच होते. एवढेच नव्हे तर, पाण्यावरून चालत जाणे हा एक अद्भूत विषय होता. थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत. सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे, नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पैलतीरी जात. त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जयजयकार करीत. रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहात. पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे. 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' हा दिव्य मंत्र तर आहेच; पण श्रीगुरु श्रीपादराज यांच्या चरणी शरण जाण्याची अनुभूती आहे. श्रीगुरुभक्त शंकर भट यांच्या श्रीगुरूंचे चरित्रआख्यानामधूनच जनमानसात या दिव्य मंत्राची ओळख झाली. 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' हा दिव्यं मंत्र फक्त अडचणीतून किंवा संकटकाळातून तारून नेतो हा विश्वास असला तरी हा परम मंत्र आपल्या जीवनाचा आधार आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत
श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट यांनी केलेली आहे. हा पवित्र ग्रंथ श्री शंकरभटाने लिहिल्यानंतर श्रीपादांच्या संकल्याप्रमाणे बापन्नाचार्यांच्या (श्रीपादांचे आजोबा) ३३व्या पिढीत तो प्रकाशित झाला. तो पर्यंत तो अदृश्य स्वरूपात श्रीपादांच्या जन्मस्थळी होता. अत्यंत जीर्णावस्थेत असलेल्या मूळ ग्रंथाची दुसरी प्रत तयार करून नंतर त्या मूळ ग्रंथाचे कृष्णा नदीत विसर्जन करण्यात आले. त्यानंतर इ.स. २००१ साली, विजयादशमीपासून, कृष्ण एकादशीपर्यंत पीठापूर येथे, श्रीपादांच्या महासंस्थानामध्ये त्या ग्रंथांचे प्रथम पारायण झाले. प्रभूनी त्यांच्या तीस वर्षांच्या कालावधीत अद्भुत, अगम्य अशा लीला दाखवून भक्तांना इह-परलौकिक शाश्वत सुख प्राप्त करून दिले. श्रीपाद प्रभुंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळ ग्रंथाच्या पठणाचे फल सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही, कोठेही पठन केल्यास स्वत: श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो, अशी ग्वाही श्रीपाद श्रीवल्लभ यांनी भक्तांना दिली आहे. प. पू. श्री हरिभाऊ जोशी निटुरकर हे महान दत्तसंप्रदायिक सत्पुरूष आहेत. त्यांना श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मराठी भाषेत भाषांतरित केले. या ग्रंथाचे पारायण करून ११ जणांना अन्नदान करावे म्हणजे फल तत्काल मिळेल, असे सांगितले जाते. कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. श्रीपाद श्रीवल्लभ वयाच्या ३० व्या वर्षी गुप्त झाले. यानंतर दत्तात्रेयांचा दुसरा अवतार नृसिंह सरस्वती असून, ते गुरुचरित्रकार आहेत. याबाबत पुढील भागात माहिती जाणून घेऊ...
जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती!
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
- देवेश फडके.