शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

BLOG: अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनादिकालाचे पूजनीय दैवत, भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त!

By देवेश फडके | Updated: December 9, 2024 13:57 IST

Datta Jayanti: दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेय देवतेचे स्वरुप, दत्तावतार, दत्तसंप्रदाय आणि दत्तात्रेयांचे महात्म्य यांविषयी अगदी थोडक्यात तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करु.

Datta Jayanti: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, असा नामघोष केल्यानंतर डोळ्यासमोर साक्षात दत्तमूर्ती उभी राहते. दत्त किंवा दत्तात्रेय देवता यांविषयी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. दत्तात्रेयांना अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असून, ही देवता अनादिकालापासून पूजनीय असल्याचे म्हटले जाते. अगदी महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथातही दत्तमाहात्म्य वर्णिले आहे. त्यानंतर आतापर्यंतच्या काळात दत्तात्रेय देवता, दत्तात्रेय देवतांचे अवतार, दत्त स्वरुप यांविषयी माहितीपूर्ण विवेचन आढळते. दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेय देवतेचे स्वरुप, दत्तावतार, दत्तसंप्रदाय आणि दत्तात्रेयांचे महात्म्य यांविषयी अगदी थोडक्यात तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करु.

आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्या बद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सच्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. हा जन्म रहित निराकार आहे. भक्तांच्या इच्छामात्रे साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो, असे दत्तात्रेयांचे वर्णन वासुदेवानंदसरस्वती यांनी केले आहे. श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भूत आहे. इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत.

संपूर्ण विश्वाचे गुरु श्रीदत्तात्रेय

श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे. दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. 

एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त 

मध्ययुगीन काळखंडाच्या चौदाव्या शतकात भगवान श्री दत्तात्रेयांचा प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि द्वितीयावतार भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज या दोन्ही युगप्रवर्तक महानुभावानी महाराष्ट्र तथा कर्नाटक प्रांतांत दत्तोपासनेचा प्रसार-प्रचार केला. त्यापूर्वी म्हणजे बाराव्या शतकात महानुभाव संप्रदायाचा आविर्भाव झाला. हा संप्रदाय केवळ दत्तप्रणितच नव्हे तर या संप्रदायाचे आदिगुरू भगवान श्रीदत्तात्रेय हेच आहेत. महानुभाव संप्रदायापूर्वी अनेक शतकांच्या आधी नाथसंप्रदाय निर्माण झाला. हा संप्रदाय भगवान श्रीदत्तात्रेयांनाच आदिगुरू मानतो. आजच्या घडीला सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे. उपनिषदे, पुराणे व महाभारत पाहिले, तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत. इतकेच नव्हे, तर प्राचीन मूर्तिविज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहेत, असे म्हटले जाते. तसेच पुढे तेराव्या शतकापासून ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती’ असे दत्तात्रेयांचे स्वरूप आहे. अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखीच झाले आहे. थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी व षड्भुज दत्तात्रेय आहेत. निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरू रघुनाथस्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षड्भुज दत्तात्रेयांचा. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी व द्विभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे, असे सांगितले जाते. तर, नाथसंप्रदायाने दत्तात्रेयांना तंत्रविद्येचे प्रवर्तक मानले आहे. नाथसंप्रदायातील अनेकांची गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजेच शंकरापर्यंत जात असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रेयांनी उपदेश केल्याच्या कथा प्रचलित आहेत. 

दत्तात्रेयांचे १६ अवतार अन् दत्तात्रेयांचे २४ गुरू

एकूण सोळा अवतार दत्तात्रेयांनी घेतले असे भाविक मानतात. दत्तसांप्रदायिक श्रीपादवल्लभांना व नृसिंह सरस्वतींना इतिहासकाळातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे अवतार मानतात.अक्कलकोटच्या स्वामीमहाराजांची आणि माणिकप्रभूंचीही दत्तावतारातच गणना होते. दत्तात्रेयांच्या १६ अवतारांमध्ये योगिराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगीजनवल्लभ, लीलाविश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभरावधूत, मायामुक्तावधूत, मायायुक्तावधूत, आदिगुरु, शिवरुप, देवदेवेश्वर, दिगंबर, कमललोचन श्रीकृष्णश्यामनयन यांचा समावेश आहे. या प्रत्येक अवताराचे महात्म्य अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. तर, भगवान श्रीकृष्णांनी आपले अवतारकार्य संपविण्याचा मानस उद्धवाला सांगितला. त्यावर उद्धवाने मला ज्ञान सांगावे, अशी विनंती केली. तेव्हा माझा पूर्वज यदू याला अवधूतरूपात श्रीदत्तात्रेयाने मी २४ गुरूंपासून घेतले ते ज्ञान तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान सांगितले. त्या त्या गुरूचे गुण व त्यापासून घेतलेला बोध हे सर्व उद्धवाला सांगितले. पृथ्वी, वायू, आकाश, जल (उदक), अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत पक्षी, अजगर, समुद्र, पतंग, भृंग, मातंग, मधुमाशी, मृग, मत्स्य, पिंगला, कुरर पक्षी, बालक, कुमारी कंकण, सर्प, शरकार, कुंभारीण माशी, कोळी असे २४ गुरु सांगितले गेले आहेत. सदर उपदेशाचा श्रीमद्भागवत पुराणात अकराव्या स्कंधात अध्याय सात ते नऊमध्ये उल्लेख आलेला आहे. प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्तमहात्म्यातही याचा उल्लेख आढळतो. दत्तात्रेयांचे २४ गुरु पाहिल्यास निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही शिकू शकतो. किंबहुना निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला शिक्षित करत असते, ते शिक्षण, माहिती, ज्ञानाचा वापर आपण आपल्या आयुष्यात करायला हवा. लहान-मोठे न पाहता आपण फक्त चांगले ते घ्यावे, अशीच शिकवण यातून मिळते. 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्राचा नेमका अर्थ

'दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा' या मंत्रात पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान. मी  देह नाही. मी आहे आत्मा. तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्. तो साक्षी आहे. निर्विकार आहे. अनंदरूप आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे. परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत. त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण  साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. त्यांना संबोधन केले आहे. चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला लवकर आपल्या जवळ न्या. आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे. तो भ्रम नाहीसा करा. अहं ब्रम्हास्मि हा अनुभव मला येऊ द्या. आपल्या सारखी दिगंबर स्थिति मलाही द्या. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे.

पादुका आणि दत्त उपासना

श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा तीशक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. 'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय. पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असणे अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके नठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करावा, असे सांगितले जाते. 

दत्ताची नावे आणि दत्त प्रतीकांचा भावार्थ

दत्त: दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देवआहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. 

अवधूत: जो अहं धुतो, तो अवधूत! अभ्यासकरतांना आपल्या मनावर ताण येतो ना? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्टकरण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे.’

दिगंबर: दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहेअसा! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. 

गोमाता: दत्ताच्या मागे असलेली गोमाता पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे, ते सर्व देते. पृथ्वी आणि गोमाता आपल्याला सर्व काही देतात.

श्वान: हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४वेदांचे प्रतीक आहेत.

औदुंबर वृक्ष: दत्ताचे पूजनीय रूप! या वृक्षात दत्त तत्त्वअधिक आहे.

कमंडलू आणि जपमाळ: हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.

शंख आणि चक्र: श्री विष्णूचे प्रतीक आहे.

त्रिशूळ आणि डमरू: शंकराचे प्रतीक आहे.

झोळी: ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महामंत्राचा अर्थ

'अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त' हा महामंत्र असल्याचे सांगितले जाते. आपण जेव्हा संकटात असतो आणि इतर सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपण श्री दत्त महाराजांचे स्मरण करतो. दत्त महाराज स्मर्तृगामी आहे. म्हणजेच स्मरण करताच तत्काळ आपल्या मदतीसाठी धावून येणारे तत्त्व म्हणजे स्मर्तृगामी. जगात अन्य कुठल्याही तत्त्वाला स्मर्तृगामी म्हणत नाही. आणि म्हणून दत्त महाराज हे लवकर पावणारे दैवत आहे. 

वारकरी  संप्रदायातील संतांनी तसेच आनंद संप्रदायी लोकांनी दत्तात्रेयाविषयी आदर व्यक्त केला आहे. दत्तोपासना पूर्वीपासून होत असली, तरी तिला संप्रदायाचे स्वरूप नरसिंह सरस्वतींच्या प्रभावामुळेच आले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचे पहिले अवतार होत. तर नरसिंह सरस्वती हे दुसरे अवतार मानले जातात. जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन रघुनाथ, माणिक प्रभू, अक्कलकोटकर स्वामी, वासुदेवानंद सरस्वती इ. महापुरुषांनी संप्रदायाची परंपरा चालू ठेवली. आजही अनेक दत्तोपासक महाराष्ट्रात आढळतात. इस्लाम प्रभावामुळे समाज सुन्न झाला होता. या नवीन संकटाला प्रतिक्रिया कशी द्यावी, हे त्याला समजत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर नृसिंह सरस्वती यांचे कार्य पाहिले पाहिजे. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोन महान व्यक्तींनी केलेले कार्य म्हणूनच अद्वितीय म्हणावे लागेल. पुढील भागात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे अवतारकार्य आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे महात्म्य याची माहिती जाणून घेऊ... 

दत्तगुरुंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ! ३० वर्षांचे अवतारकार्य अन् कालातीत महती

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 

- देवेश फडके.

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिक