गणेश उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे विशेष असते. हजारो भाविक दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला मनोभावे गणपती बाप्पाचे पूजन, उपवास, नामस्मरण करत असतात. आपल्या संस्कृतीत आचरल्या जाणाऱ्या व्रतांना वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या यांना अनन्य महत्त्व असते. आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे. नवरात्रोत्सव दसरा झाल्यानंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. याला करक चतुर्थी असेही म्हटले आहे. या संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची पद्धत शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...
अश्विन संकष्ट चतुर्थी: २४ ऑक्टोबर २०२१
अश्विन वद्य चतुर्थी प्रारंभ: २३ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यरात्री ०३ वाजून ०१ मिनिट.
अश्विन वद्य चतुर्थी समाप्ती: २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे ०५ वाजून ४३ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, २४ ऑक्टोबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला करक चतुर्थी असेही संबोधले जाते. या दिवशी उत्तर भारतात करवा चौथ हे व्रत मोठ्या भक्तिभावाने आचरले जाते.
संकष्ट चतुर्थीच्या व्रताचरणाची सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकून घ्यावीत. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी नवरात्रोत्सवानंतर आणि दिवाळीच्या आधी येत असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त होते, असे म्हटले जाते. या दिवशी चंद्र वृषभ राशीत असून, याच राशीत राहुदेखील विराजमान आहे.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
| शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
| मुंबई | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
| ठाणे | रात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे |
| पुणे | रात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे |
| रत्नागिरी | रात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे |
| कोल्हापूर | रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिट |
| सातारा | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
| नाशिक | रात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे |
| अहमदनगर | रात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे |
| धुळे | रात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे |
| जळगाव | रात्रौ ०८ वाजून २९ मिनिट |
| वर्धा | रात्रौ ०८ वाजून १७ मिनिटे |
| यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून २० मिनिटे |
| बीड | रात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे |
| सांगली | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |
| सावंतवाडी | रात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे |
| सोलापूर | रात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे |
| नागपूर | रात्रौ ०८ वाजून १४ मिनिटे |
| अमरावती | रात्रौ ०८ वाजून २० मिनिटे |
| अकोला | रात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे |
| औरंगाबाद | रात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे |
| भुसावळ | रात्रौ ०८ वाजता २८ मिनिटे |
| परभणी | रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे |
| नांदेड | रात्रौ ०८ वाजून २५ मिनिटे |
| उस्मानाबाद | रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे |
| भंडारा | रात्रौ ०८ वाजून १२ मिनिटे |
| चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून १६ मिनिटे |
| बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे |
| मालवण | रात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे |
| पणजी | रात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे |
| बेळगाव | रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे |
| इंदौर | रात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे |
| ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून ०७ मिनिटे |