Shree Swami Samarth Sthapana Diwali 2025: यंदा २०२५ मध्ये १७ ऑक्टोबर २०२५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळी साजरी होत आहे. मराठी वर्षात येणारे सण-उत्सव हे धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या तर महत्त्वाचे आहेतच, शिवाय नैसर्गिक आणि शास्त्रीय दृष्ट्याही त्याचे महात्म्य विशेष असल्याचे सांगितले जाते. अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. परंतु, स्वामी कायम आपल्यासोबत हवेत, स्वामींची मनापासून सेवा करता यावी, अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी श्री स्वामी समर्थ घरी यावेत, आपली सेवा रुजू करून घ्यावी, असे अनेकांना वाटत असते. दिवाळीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर स्वामींना घरी आणण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला मानली गेली आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन् भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शंभर वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे.
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील
श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती किंवा प्रतिमा अतिशय प्रेरणादायी आहे. ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा भेट म्हणून मिळालेली असली आणि त्याचे पूजन तुम्हाला करायचे असेल, तर त्याची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते. स्वामींचा सहवास मिळावा म्हणून घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना कशी करावी, ते जाणून घेऊया...
- स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्त्व प्राप्त होते.
- स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी, मात्र जागेचा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल, अशी निवडावी.
- मूर्ती स्थापनेसाठी दिवाळीतील कोणताही शुभ दिवस निवडावा. कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीच हरकत नाही.
- स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी करता येते. परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चारण, पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा करणे अधिक उत्तम मानले जाते. कारण मंत्रांच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊ शकते.
- गुरुजी मिळत नसल्यास एका ताम्हनात स्वामींची मूर्ती घ्यावी. स्वामींची पंचोपचार किंवा षोडषोपचार पूजा करावी. स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत 'श्री स्वामी समर्थ' मंत्राचा उच्चार करावा.
- ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोडाचा नैवेद्य बनवायला विसरू नका.
- अभिषेकयुक्त पंचोपचार किंवा षोडषोपचार पूजन झाल्यावर यथाशक्ती स्वामी मंत्रांचा जप करावा. तारक मंत्र अवश्य म्हणावा.
- स्वामींच्या पूजनात पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे पेढे/मिठाई यांचा आवर्जून समावेश करावा.
- स्वामींना जो नैवेद्य अर्पण करणार आहात. त्या प्रसादाचे अवश्य वाटप करावे.
- रोज सकाळी सायंकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी!
- शक्य झाल्यास स्वामींची प्रतिष्ठापना केल्यानंतर गुरुलीलामृत, स्वामी चरित्रामृत या ग्रंथांचे पठण नक्की करावे.
- ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती स्थापित केली आहे, ती जागा कायम स्वच्छ, नेटनेटकी, टापटीप ठेवावी.
- स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा.
- मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Web Summary : Invite Shree Swami Samarth home this Diwali for lifelong blessings. Establish the idol with devotion, following specific rituals. Maintain cleanliness and unwavering faith for divine grace.
Web Summary : इस दिवाली पर श्री स्वामी समर्थ को घर लाएं और आजीवन आशीर्वाद पाएं। भक्ति के साथ मूर्ति स्थापित करें, विशिष्ट अनुष्ठानों का पालन करें। दिव्य कृपा के लिए स्वच्छता और अटूट विश्वास बनाए रखें।