राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कडा येथील अमोलक शिक्षण संस्थेच्या एस .के .गांधी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थी व युवकांकरिता पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा २२ ते २६ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान झूम व यूट्यूब लाईव्हद्वारा ऑनलाईन पार पडली. या कार्यशाळेस संपूर्ण देशभरातून ५४३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
पुणे , औरंगाबाद, नागपूर , बंगलोर, इत्यादी ठिकाणांहून मान्यवरांच्या व्याख्यानाचा विद्यार्थ्यांनी व अनेक युवकांनी लाभ घेतला ‘संवाद कौशल्य, नोकरी व करिअरच्या विज्ञानातील संधी, तसेच भावनांचे उपयुक्त निराकरण’ या विषयावर ही कार्यशाळा रसायनशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी संभाषण करीत असताना सहजता व सजगता बाळगावी व सुसंवादाची सवय घालून ते दररोज आचरणात आणावे असे मत डॉ महेंद्र पटवा समन्वयक यांनी मांडले. कार्यशाळेस प्रमुख वक्ते प्राचार्य बी. एच . झावरे यांनी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत विविध संशोधन संस्थांची माहिती दिली. या कार्यशाळेत डॉ मीरा कुलकर्णी यांनी संवाद कौशल्य यावर व्याख्यान दिले. तसेच डॉ आरती शनवारे यांनी बायो फर्टिलायझर व बायोपेस्टिसाईड यावर आधारित नैसर्गिक शेतीमध्ये युवकांनी कार्य करावे असे विवेचन आपल्या व्याख्यानातून केले.
डॉ. अभिजीत मंचरकर यांनी नेतृत्व विकास तर डॉ. प्रीतम बेदरकर यांनी करिअरमधील उत्कृष्ट संधी यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी राजेश चंचलानी यांनी संवाद कौशल्यासोबत संवाद व आत्मपरीक्षण ही काळाची गरज आहे असे सांगत व प्रात्यक्षिके घेऊन युवकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी यांनी युवकांनी आपले भविष्य घडवत असताना प्रामाणिक कष्ट करावेत व या कार्यशाळेतून लाभलेल्या उपयुक्त विचारांना अंगीकृत करावेत असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेचे संयोजन, प्रा.डॉ. सुवर्णा देशमुख , रसायनशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. प्रा सोमनाथ हासे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.