बीड : नवगण राजुरी येथे चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातून एका चोर महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
२ मार्च रोजी चतुर्थीच्या निमित्त बीड शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या गोदावरी परमेश्वर फिरंगे या गणपती दर्शनासाठी राजूरी नवगण येथे गेल्या होत्या. यावेळी दर्शनाच्या रांगेत उभा असताना त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण ज्याची किंमत अंदाजे ५० हजार रुपये इतकी होती. ते अज्ञाताने चोरून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर फिरंगे यांनी याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
यावेळी हे गंठण मडसांगवी (ता.पाथर्डी जि.अ.नगर) येथील महिला लिलाबाई सुखदेव जाधव हिने चोरल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी छापा मारत पथकाने शुक्रवारी जाधव हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी व तपासणी केली असताना तिच्याकडे चोरीला गेलेले गंठण मिळून आले. लिलावबाई जाधव हिला पुढील तपासासाठी बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा. अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपाधीक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.
इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता
गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याच्या घडना यापुर्वी देखील घडल्या होत्या. याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत. लिलावती जाधव हिच्यासोबत अन्य साथीदार कोण कोण आहेत. याचा शोध पोलीस घेत असून, अन्य काही गुन्हे देखील उघड होण्याची शक्याता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.