बीड : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमीकमी होऊ लागला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हामुळे नद्या, नाले कोरडे पडले आहेत. चांगला पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी वाढली होती, त्यामुळे विहीर, बोअरवेलचे पाणी मात्र बहुतांश ठिकाणी सुस्थितीत असल्याचे चित्र आहे.
सुरळीत वीज मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त
माजलगाव : सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने उन्हाळी पिके घेणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी वीज पंपांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केलेला असला तरी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे कृषीपंप सुरू होत नसून पाणी असून पिकांना देता येत नसल्याची स्थिती आहे.
सोयाबीनची आवक घटली
बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला पाच हजारांपेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे. सोयाबीनचे दर वाढले असले, तरी बाजारात सोयाबीनची आवक पाहिजे त्या प्रमाणात राहिली नाही. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. त्यांना आणखी भाववाढीची अपेक्षा आहे.
गौखेल जि.प. शाळेचा कायापालट
अंभोरा : आष्टी तालुक्यातील गौखेल येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शहाजी मोरे, सहशिक्षक संदीप सिरसाठ, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष अशोक शेकडे, सरपंच कृष्णा शेकडे यांनी शाळा अनुदानाचा इतरत्र खर्च न करता व लोकसहभाग जमा करून शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.