केज : तालुक्यातील २३ पैकी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने १९ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचा सोमवारी निकाल जाहीर झाला. मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे चित्र दिसून आले तर तालुक्यातील पैठण येथे पाणी फाउंडेशन मध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या हाती मतदारांनी गावची सत्ता दिली. सोमवारी सकाळी दहा वाजता केज तहसील कार्यालयाच्या तळघरात सहा फेऱ्या व दहा टेबलवर मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीस आलेल्या उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रवेश देण्यात आला. सकाळी अकरा पासून ग्रामपंचायतीचे निकाल येण्यास सुरवात झाली. येणारे निकाल हे सत्ताधारी गटास हादरा देणारे ठरले तर मतदारांनी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देत त्यांच्या हाती गावाचा कारभार सोपवल्याचे चित्र दिसून आले.
गावात स्वच्छता करीत विजयाचा जल्लोष
तालुक्यातील पैठण येथील ग्रामपंचायत मतदारांनी पाणी फाउंडेशनचे काम करणाऱ्या युवकांच्या हाती सोपवली विजयी सर्व उमेदवारांनी पैठण येथे जाऊन हातात झाडू घेत गावाची स्वच्छता करत आपला आनंदोत्सव साजरा केला.
काशिदवाडीत पतीला डावलले, पत्नीला कौल
तालुक्यातील काशिदवाडी ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी पतीला मतदारांनी डावलत त्यांच्या पत्नीस मताचा कौल देत विजयी केले.