होळ : केज तालुक्यातील होळ येथे दिनांक ४ जानेवारी रोजी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीला परिसरातील वारकरी संप्रदायाचे भाविक उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून ‘गाव तेथे शाखा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत होळ येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात सोमवारी परिषदेचे जिल्हाध्यक्ष संभाजी खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी परिषदेचे तालुकाध्यक्ष रामचंद्र शिर्के, उपाध्यक्ष मेघराज कदम, संपर्कप्रमुख रामदास साबळे, शहराध्यक्ष शुभम गंभीरे, मार्गदर्शक लिंबाजी पांचाळ, धारूर तालुका सचिव दत्तात्रय कदम व वैजनाथ मेहेत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिर्के यांनी परिषदेच्या कामकाजाची माहिती सांगून वारकरी संप्रदाय वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करण्यात येत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात खेडकर म्हणाले, संतांची शिकवण अंगिकारून मानव, पशू-पक्षी व निसर्गावर प्रेम करून जीवनाचा आनंद घ्यावा. परिषदेच्या माध्यमातून संतांनी सांगितलेल्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ही बैठक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी होळ येथील भाविकांनी पुढाकार घेतला. नामदेव शिंदे यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.