घरकुलाचे हप्ते थकले
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते अद्याप लाभार्थींच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. लाभार्थींनी सातत्याने पाठपुरावा करूनही थकीत हप्ते जमा होत नसल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यात आर्थिक निधीची तरतूद करून लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते द्यावेत. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केली आहे.
कीटकनाशकांचा वापर
अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने तालुक्यातील शेतकरी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. भाजीपाला पिकांवर मात्रेनुसारच कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. एकाच कीटकनाशकाचा वापर सतत करणे धोक्याचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी औषधांची आलटूनपालटून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रमिकांना जॉबकार्डची प्रतीक्षा
अंबाजोगाई : शेतीतील कामे संपली आहेत. सध्या काढणी, मोडणी अशी कामे संपल्याने ग्रामीण भागातील अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. अशा बेरोजगार कामगारांना रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरी करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी जॉबकार्डाची नितांत आवश्यकता आहे. शासनाच्या वतीने हे जॉब कार्ड उपलब्ध करून द्यावेत व कामगारांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे.
प्रभारी लाईनमनमुळे नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक गावांमध्ये दोन ते तीन गावांचा पदभार एका लाईनमनकडे आहे. तालुक्यात लाईनमनची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. लाईनमन मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या रिक्त जागा न भरल्याने अनेक गावांचा पदभार एकाच लाईनमनकडे दिला जातो. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र लाईनमन द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद इंगळे यांनी केली आहे.