माजलगाव : येथील नगरपालिकेच्या वतीने शहरात जागोजागी पडलेले लिकेज काढण्यात येत असून ठिकठिकाणी खड्डे करण्यात आले आहेत. हे काम संथगतीने सुरू असल्याने व या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकाना सदरील खड्डे लक्षात येत नसल्याने ही वाहने खड्ड्यात जात आहेत. यामुळे मोंढ्यातून चालने मुश्कील झाले आहे.
नगरपालिकेकडून सध्या शहरातील ठिकठिकाणचे पाइपलाइनचे लिकेज काढणे सुरू आहे. यासाठी खड्डे मोठमोठे करण्यात आल्याने व ते व्यवस्थित न भरल्याने या ठिकाणी वाहने फसत आहेत. मोंढ्यात माल घेऊन येणारी वाहने यात फसू लागली आहेत, तर हे खड्डे करून या ठिकाणावरून जाणारे नळकनेक्शन न जोडताच खड्डे भरल्याने नळाचे पाणी रस्त्यावर आल्याने मोंढ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यामुळे मोंढ्यातून नागरिकांना व वाहनधारकांना वाहन चालविणे मुश्कील झाले आहे. या खड्ड्यात वाहन आदळत असल्याने व वाहन जमिनीला चिटकत असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
अनेक वेळा लहान मुले पाणी दिसल्याने या पाण्यात पडत आहेत. यामुळे अनेक मुलांना मुक्कामारदेखील लागण्याचे प्रकार सुरू आहेत. हे नळ न जोडता खड्डे बुजवण्याचे काम करत आहेत. ज्या दिवशी नळाला पाणी आल्यावर आपला नळ तुटल्याचे लक्षात आल्यावर तो नळ जोडण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे गेल्यावर तो नळ जोडण्यासाठी अडवणूक करताना दिसत आहेत.