दिंद्रुड : मागील काही दिवसांपासून दुचाकीच्या अपघातांमध्ये वाढ होत असून, ही अपघात मालिका सुरूच आहे. रविवारी बीड-परळी महामार्गावर दिंद्रुडजवळ सायंकाळी एका टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.
सुंदर हरिभाऊ राऊत (वय ५०, रा. भुरेकवडगाव, ता. वडवणी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात धोंडिबा गुणाजी सोनवणे गंभीर जखमी झाले आहेत. सिरसाळा येथे लग्न समारंभानंतर परतत असताना त्यांच्या दुचाकी (एम. एच. ४४ / एन. ०६२७)ला गुजरातकडून हैदराबादकडे जाणाऱ्या टेम्पो (डी एन ०९ क्यु ९९२०)ने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राऊत जागीच ठार झाला. दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होत जखमी सोनवणे यांना रुग्णालयात हलविले. मृतास शवविच्छेदनासाठी माजलगाव शासकीय रुग्णालयाकडे हलविले.
टेम्पोचालकाला चोप
टेम्पोचालक दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आल्याने रहदारी करणाऱ्या लोकांनी टेम्पोचालकास बेदम चोप दिला. घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या टेम्पोला सिरसाळा पोलिसांनी पकडत दिंद्रुड पोलिसांच्या ताब्यात दिला. दरम्यान, गेल्या काही दिवसांत बीड-परळी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, चिंता व्यक्त केली जात आहे.