माजलगाव : ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीद्वारे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी कारवाई करत पकडले. शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या दरम्यान काळेगावथडी येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील काळेगावथडी येथे शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टरद्वारे चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना मिळाली होती. यावर उपविभागीय अधिकारी गायकवाड पथकासह कारवाई करण्यासाठी गेले असता एक विनानंबरच्या ट्रॅक्टरसह आणखी एक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एक-एक ब्रास वाळू चोरून घेऊन जात असल्याचे आढळून आले. या वाळू चोरांना रोखले व ग्रामीण पोलिसांना पाचारण करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. तलाठी तुळशीदास काटे यांच्या फिर्यादीवरून चोरटी वाहतूक करणारे राहुल नागनाथ सावंत व बाळासाहेब मदनराव तौर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र गौण खनिज कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.