गस्त वाढवावी
बीड : शहरातील बाजारपेठा सध्या खरेदीसाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी गजबजून गेल्या आहेत. याच गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोरही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. या चोरांवर अंकुश राहील, नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.
नदीचे पात्र झाले अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीपात्रातील स्वच्छतेची मागणी होत आहे.
रौळसगाव-बोरखड रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील रौळसगाव व बोरखेड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार खड्डा चुकविताना अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमधून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.