परळी : तालुक्यातील मालेवाडी शिवारातील दत्तवाडी येथील शेतात थंडीत शेकोटी करीत बसलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्या दिसून आला. गुरुवारी वनपरिक्षेत्र कार्यालय परळीच्या वनसंरक्षण अधिकारी व्ही. एम. दौंड व वनपाल राठोड यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले.
मालेवाडी शिवारात बिबट्याचा संचार झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्या की तडस, हे मात्र स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी प्राण्याच्या पायाचे ठसे वन अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. परंतु त्यातून काही दिसत नाही, असा खुलासा वनविभागाच्या वतीने करण्यात आला आहे. मालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भुराज बदने म्हणाले की, बुधवारी रात्री थंडीत शेकोटी करीत बसलेल्या तीन शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. मात्र तो तिथून गायब झाला आहे. गुरुवारी वन अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली.