दुर्घटना टाळण्यासाठी वेग नियंत्रणाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील तेलगाव येथून जाणाऱ्या दोन महामार्गांवरील सुसाट वाहतूक वर्दळीच्या तेलगाव चौफुला परिसरातही होत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. या परिसरात वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
खामगाव-पंढरपूर व परळी-बीड हे दोन महामार्ग असल्याने या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे. दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी असते. वाहनांना वेग मर्यादा नसल्याने चौकाच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्यावर कुठेही गतिरोधक किंवा वाहनांना वेग मर्यादेच्या सूचना नसल्याने या परिसरात सुसाट वेगाने वाहने चालविली जातात. परिणामी लहान- मोठे अपघात नेहमी होत आहेत. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या भागात वाहनांना वेगमर्यादा निश्चित करावी, चारही बाजूने गतिरोधक बसवावेत तसेच वेग नियंत्रणाबाबत उपाययोजना करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची मागणी विठ्ठलराव लगड यांनी केली आहे.