माजलगाव : लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवत येथील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचे साठे केले जात आहेत. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात व्यापारी साठे करू लागले असताना येथील प्रशासन गप्पच दिसून येत आहे.
मार्च २०२० मध्ये ज्यावेळी लॉकडाऊन झाले होते, तेव्हा अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन व्यवहारातील लागणाऱ्या वस्तू शिल्लक होत्या. त्या अनेक होलसेल व्यापाऱ्यांनी बेभाव विक्री करीत मोठ्या प्रमाणात माया जमविली होती. त्याचप्रमाणे आता कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवत अनेक व्यापाऱ्यांनी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तुूचे साठे करायला सुरुवात केली आहे.
तेल, डाळी, तांदूळ, चुरमुरे, पोहे आदींचा साठे होताना दिसत आहेत. तेलाचे भाव दिवाळीपूर्वीच वाढले होते. ते दिवाळीनंतर दिवसेंदिवस वाढतच गेले व पुढे आणखी वाढतील किंवा लॉकडाऊन होईल, यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी तेलाचे मोठ्या प्रमाणावर साठे करून ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेलांचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना ३०० रुपयांचा तंबाखूचा पुडा १००० तर पाच रुपयांची गुटखा पुडी २५ रुपयांपर्यंत विकून अनेकांनी लाखो-करोडोंची माया जमवल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे साठे करणाऱ्यांना आता पुन्हा लॅकडाऊन हवे आहे असे ते बोलताना दिसत आहेत.
लाॅकडाऊनच्या काळात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या साठ्याबरोबरच शहरात तंबाखूजन्य पदार्थांचेही मोठ्या प्रमाणावर साठे करून मोठी माया जमविली होती. ज्या लोकांनी या माध्यमातून मोठी माया जमविली होती ते सध्या मोठी वाहने विकत घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यावेळी एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नाही. सध्यादेखील लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवत दैनंदिन जीवनात लागणारे व तंबाखूजन्य पदार्थांचे साठे केले जात असताना यावर कोणाचाही अंकुश दिसून येत नाही. तर याची तक्रार कोणाकडे करावी हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.