माजलगाव : समाजकारण, राजकारण, आदर, जिव्हाळा, त्याग, निष्ठा या नैतिक मुल्यांचे भांडार राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रात आहे. आजच्या परिस्थीतीत याची नितांत गरज आहे. वर्तमानात मातांनी जिजाऊंचा आदर्श घेत नितीवान पिढी घडवावी, असे विचार शिक्षिका अर्चना दायमा यांनी मांडले.
माजलगाव येथील म. ज्यो. फुले विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख वक्त्या म्हणून दायमा या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कवी प्रभाकर साळेगावकर हे होते. संतोष मुळी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप भिलेगावकर, विजयकुमार कुलकर्णी, संतोष जोशी, सुमंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उर्मिला झांबरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. ओघवते प्रास्ताविक सुमंत गायकवाड यांनी केले. यावेळी प्रदीप भिलेगावकर यांचेही समयोचित मनोगत झाले.
अध्यक्षीय समारोप करताना कवी प्रभाकर साळेगावकर यांनी कविता सादर केली. समारंभातील उच्चतम विचार अधोरेखित केले.
ओ. एम. दायमा, प्रवीण काळे, राजाभाऊ शिवणकर, सुमेध घाडगे यांनी संयोजन सहाय्य करून समारंभ नेटका केला. अरुण सोळंके यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष जोशी यांनी आभार व्यक्त केले.