विजयकुमार गाडेकर
शिरूर कासार : सुवर्णमहोत्सव पाहिलेल्या सिंदफना मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची न वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीदेखील खुंटली आहे. लाखो रुपयांचा खर्च पाण्यात नव्हे तर माती कामातच गेल्याचे चित्र प्रकल्प परिसरातील लाभार्थी शेतकरी सोळा वर्षांपासून पाहत आले आहेत. हे काम अपूर्ण असल्याने झालेला खर्च अनाठायी ठरतो आहे. निव्वळ सांडव्याचे काम बाकी असून, ते पूर्ण झाले तर शेतकऱ्यांना मोठा जलाधार मिळू शकतो. यासाठी जनआंदोलनाची वेळ आली आहे.
१९६५ साली सिंदफना मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन शिरूरसह पिंपळनेर, गोमळवाडा, रुपूर राक्षसभुवन ते थेट ब्रह्मनाथ येळंबपर्यंत पाणी गेले. परिणामी हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी हरितक्रांतीचा जनक बनला. मात्र दिवस मागे पडत गेले. वर्ष उलटत गेले आणि हळूहळू प्रकल्पात गाळ जमा होत पाणी साठवण क्षमता घटली. भीजक्षेत्रसुध्दा कमी होत गेले. त्यामुळे सांडव्याची उंची वाढविण्याच्या मागणीने जोर धरला. पुढे उंचीचा हा प्रश्न मंजूरही झाला आणि कामाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र मातीच्या भिंतीच्या उंचीचे काम पूर्ण झाले आणि नेमके सांडव्याची उंची वाढविण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला तो आजतागायत संपलेला नाही. प्रकल्प भरला की पाणी सिंदफना नदीतून वाहून वाया जाते. मात्र निष्पत्ती होत नसल्याचे दुःख शेतकरी निमूटपणे सहन करतो आहेत. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला होता. अवघ्या एक वर्ष कालमर्यादेत काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. परंतु सोळा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड लोटला तरी या कामाला पूर्णविराम मिळालेला नाही, हे शल्य कायम बोचते आहे. २००५ पासून निवेदन, आंदोलन, धरण क्षेत्रात उपोषण असे सर्व सोपस्कार शेतकेऱ्यांनी केले. याकामी सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण त्यावेळचे मुख्यमंत्री व संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन, उपोषण करून लक्ष वेधले होते. त्यानंतर सचिन जायभाय या पिंपळनेरच्या तरुणाने याकामी पुढाकार घेतला होता. मात्र कशात आडकाठी येते हे समजलेले नाही. हे काम पूर्ण झाले तर पाणीसाठा वाढून पुन्हा एकदा शिवार सुजलाम् सुफलाम् पाहता येणार आहे.
दृष्टिक्षेपातील सिंदफना मध्यम प्रकल्प
प्रकल्प उभारणी १९६५ ,
उंची वाढवण्याच्या कामाला सुरुवात २००५ ,
लाभक्षेत्रातील गावे- पिंपळनेर, गोमळवाडा, रूपूर राक्षसभुवन , कोळवाडी, शिरूर व ब्र. वेळंब,
140821\4137img-20210810-wa0004.jpg
फोटो