बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूसत्र मंगळवारीही सुरूच होते. मंगळवारी आणखी तिघांचा बळी गेला. तसेच ३० नवे रुग्ण आढळले, तर १७ जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. सोमवारी तीन मृत्यू झाल्यानंतर मंगळवारीही तेवढ्याच मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात अंबाजोगाई शहरातील ५७ वर्षिय पुरुष, परळी तालुक्यातील इंदपावाडी येथील ७२ वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील आवजगाव येथील ६७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच मंगळवारी ५७० संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ५४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधित आढळलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ११, आष्टी ४, बीड १०, परळी व वडवणी प्रत्येकी २ व शिरूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरात १७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९३२ झाली आहे. यापैकी १६ हजार ११० जण कोरोनामुक्त झाले. कोरोना बळींचा आकडा ५३९ इतका झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जि.प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी केले आहे.