माजलगाव :तालुक्यातील वाळु ठेक्यांचा लिलाव होऊनही ते सुरू करण्यात न आल्याने गोदावरी नदी पात्रातून वाळु माफिया महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून अवैध उपसा करीत आहेत. खुलेआम वाळू विक्री सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
माजलगाव तालुक्यात ७५ टक्के भागास गोदावरी नदीचा आधार असून, जवळपास २४ गावांमध्ये वाळुसाठा उपलब्ध आहे; परंतु लिलावापेक्षा वाळूच्या चोरट्या तस्करीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना जास्त पैसा मिळत आहे. तालुक्यातील ३ वाळूघाटांचा लिलाव होऊनही ते सुरूच नसल्याने माफियाकडून गंगामसला, बोरगाव, आबेगाव, सादोळा, पुरुषोत्तमपुरी, रिधोरी, गव्हाणथडी यांसह अनेक ठिकाणाहून वाळू उपसा बिनदिक्कत सुरू आहे. रात्री १० ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान शहरात बांधकामे असलेल्या ठिकाणी वाळू पुरवठा केला जातो. त्यामुळे वाळूची ढिगारे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दिसून येत आहेत. वाळू माफिया ५० हजारास टिप्परप्रमाणे बेभाव वाळू विक्री करत असल्याने नागरिकांचे मात्र हाल होताना दिसून येत आहेत.
मागील महिन्यात उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना वाळूची गाडी चालू देण्यासाठी ६५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने येथील महसूल प्रशासनात बोकाळलेला भ्रष्टाचार उघड झाला होता, तर या प्रकरणानंतर वातावरण टाईट आहे, असे भासवून महसूल अधिकारी, कर्मचारी व पोलीस आपली वरकमाई वाढवून घेत असल्याने आपल्या हातात काहीच पडत नसल्याचे वाळुमाफिया बोलताना दिसत आहेत.
महसूलचे पथक नावालाच
येथील तहसीलदारांनी वाळूवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पथक नेमले होते. हे पथक कार्यरत असताना रस्त्यावर जागोजागी मुख्य रस्त्यावर व गल्लोगल्लीत वाळुचे साठे दिसत असताना या पथकाकडून आतापर्यंत एकावरही कारवाई करण्यात आली नाही, यामुळे नियुक्त केलेले पथक हे अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. तर हे पथक केवळ नावालाच असल्याचे तहसीलमधील कर्मचारी सांगताना दिसत आहेत.
----------
तालुक्यातील नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून विकणाऱ्यांंवर महसूल विभागाच्या पथकाद्वारे निगराणी ठेवत आहोत.
--वैशाली पाटील, तहसीलदार माजलगाव.
===Photopath===
200321\purusttam karva_img-20210320-wa0046_14.jpg