मांडेखेल येथील शेतकरी मिलिंद महादेव वाव्हळे हे आपल्या आई-वडील भावासह जेवण करून झोपलेले होते. १ मार्च रोजी पहाटे वाव्हळे यांच्या खोलीतील कपाट तोडून चोरट्यांनी कपाटातील नगदी ४० हजार रुपये व सोन्या-चांदीचा ऐवज तसेच मोबाईल व पाॅवरबँक चोरून नेली. यावेळी चोरट्याचा आवाज ऐकताच मिलिंद वाव्हळे जागे झाले; परंतु चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यावर बॅटरीचा प्रकाश टाकला व धूम ठोकली. यावेळी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु ते अंधारातून निघून गेले. या प्रकरणी १ मार्च रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून तिघा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शहाणे हे तपास करीत आहेत.
मांडेखेल येथे गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ चालू असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.