लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात महावितरणकडून केला जाणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. तसेच केला जाणारा वीजपुरवठाही अत्यंत कमी दाबाने होतो. त्यावर विद्युत पंप चालत नाही. शेतात ऊस व अन्य पिके उभी आहेत. मात्र, विजेअभावी ही पिके संकटात सापडली आहेत. महावितरणने सध्या अंबाजोगाई तालुक्यात वीजबिल वसुलीसाठी अनेक गावांमध्ये वीज जोडणी तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यातच अनेक गावांमध्ये वीज पुरवठा विविध कारणांमुळे ठप्प राहतो. जिथे वीज पुरवठा सुरू आहे, तिथे अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने त्यावर विद्युत पंप चालत नाही. त्यामुळे ऊस, भाजीपाला व विविध पिके पाण्याअभावी वाळत आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजबिल न भरल्यामुळे अनेकांची वीज जोडणी तोडण्यात आली आहे. कोरोनाचे संकट व त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. बिल भरण्यासारखी स्थिती नसताना वीज मंडळाने सक्तीने वीजबिल वसुली सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.