उघड्या डीपींमुळे धोका वाढला
माजलगाव : तालुक्यात बहुतांश ठिकाणी महावितरणच्या डीपी उघड्या स्थितीत आहेत. यातील अनेक डीपी सहजरीत्या हाताला पोहोचतील, अशा अवस्थेत आहेत. यातील अनेक डीपींचे दरवाजे तुटून वर्षानुवर्षाचा कालावधी लोटला, तरी त्या डीपींना दरवाजे बसले नाहीत. शेतात जाणारी लहान मुले, पशुधन, हे कधीही उघड्या डीपीकडे जाऊ शकतात. याचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीषण स्थिती असतानाही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
दर वाढल्याने बांधकामात अडचणी
आष्टी : तालुक्यात गेल्या दोन वर्षांत रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणाऱ्या रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुपटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. नागरिकांच्या बांधकामाचे बजेट दुपटीने वाढले आहे.