गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी शहरातील गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
संत काशिबा महाराज यांना अभिवादन
बीड : गुरव समाजाचे महान तपस्वी संत काशिबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र कनकालेश्वर मंदिर सभागृहात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी अ. भा. गुरव समाज संघटनेचे संजय गुरव, महिला प्रदेश सरचिटणीस अनिता गुरव, चंद्रकांत गुरव, प्रभाकर महाराज गुरव, श्रीराम गुरव, कल्याण महाराज गुरव, गणेश गुरव, अजय गुरव, प्रसाद गुरव आदी उपस्थित होते.
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरूस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरूस्त हातपंप दुरुस्तीची मागणी होत आहे.
दामिनी पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी
परळी : शहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्च २०पासून शाळा, महाविद्यालये बंद होती. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. दहावी, बारावी व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क भरणे सुरू असून, ग्रामीण भागातूनही मुली शहरात येतात. अशावेळी मुलींना रोडरोमिओ त्रास देतात. अशा घटना शहरात घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी चिडीमार, दामिनी पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.