अंबाजोगाई शहरातील १९ वर्षीय मुलगी २१ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, या मुलीला अंबाजोगाई शहरालगतच्या एका गावातील तरुणाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांना होता. त्यावरून त्यांनी अन्य पाच जणांच्या मदतीने २८ डिसेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजता त्या तरुणाच्या वडिलांना नगरपालिका परिसरातून उचलले. त्यांचे डोळे बांधून कारमधून नेऊन एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये डांबले. तिथे तुझा मुलगा आमच्या मुलीस कुठे घेऊन गेला आहे, असे विचारून याला गोळ्या घाला म्हणत काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता त्यांना भगवानबाबा चौकात सोडून देण्यात आले, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास पो.ना. गुट्टे करत आहेत.
मुलीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या वडिलांना शेतात डांबून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST