तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन
विष्णू गायकवाड
गेवराई : गत तीन-चार दिवसांपासून ऊन तापत असून नागरिकांनी त्वचारोगाबरोबरच आरोग्य सांभाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे
उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा सामावेश आहे.
उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्या-पिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत सर्वत्र जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. त्यमध्ये शरीराचे तापमान उच्चपातळीवर जाते योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता ही अधिक असते. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू, पाणी, ताक आदींचा वापर नियमित करावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
अशी घ्यावी काळजी
हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
बाहेर जाताना गॉगल्स टोपी बूट व चप्पलचा वापर करावा. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तीने डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
अशक्तपणा स्थूलपणा डोकेदुखी सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बाहेर कामकाज करत असताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.
गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी.
काय करू नये
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंडपेय याचा वापर टाळावा.
दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.
गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे.
ऊन कडक तापत असल्यामुळे अशा उन्हात फिरल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे अशक्तपणा डोकेदुखी ताप येणे चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी, गेवराई
उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे. जास्त प्रमाणात घाम असल्यास घामोळ्या होण्याची दाट शक्यता असते. उन्हातील अतिनील किरणांचा त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. धनंजय माने, वैद्यकीय अधिकारी, निपाणी जवळका