सखाराम शिंदे
गेवराई : बीड जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २६ मार्चपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन लागू केला आहे. पहिल्यादिवशी शहरातील सर्व व्यापारी पेठा बंद राहिल्या, तर नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य दिसून आले.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे नागरिक विनामास्क फिरत होते; तर लग्न समारंभांसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. मागील दहा-बारा दिवसांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यात रोज २०० ते ३०० रुग्ण आढळून येत असल्याने व शेजारच्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात दहा दिवस लाॅकडाऊनचे आदेेश दिले.
शुक्रवारी शहरातील किराणा, हाॅटेल, भोजनालय, जनरल स्टोअर्स, कापड, सोने, मोबाईल शाॅपीसह सर्व व्यापारी पेठा बंद ठेवल्याने व्यापारी पेठेत शुकशुकाट दिसत होता; तर रुग्णालये व मेडिकल वगळता सर्व काही बंद होते. तर नेहमी गजबजलेले चौक, रस्ते निर्मनुष्य दिसत होते. या बंदमध्ये ठीक-ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तालुक्यातील जातेगाव, उमापूर, तलवाडा, मादळमोही, चकलांबा, गढी, पाडळसिंगी, धोंडराईसह विविध भागातही कडक बंद राहिला.
===Photopath===
260321\20210326_100652_14.jpg