माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पीएसआय विठ्ठल शिंदे यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन येथील माजी सरपंच दिलीप कोमटवार यांच्या मुलावर केलेली खोटी केस तत्काळ मागे घेत पीएसआय विठ्ठल शिंदे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणेबाबत दिंद्रुड ग्रामस्थांनी बीड पोलीस अधीक्षकांना ६ जानेवारी रोजी निवेदन दिले.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व अखिल भारतीय समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या हस्ते हे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी दिंद्रुड गावचे सरपंच व सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पॅनल प्रमुख दिलीप कोमटवार व त्यांच्या कुटुंबीयांवर खोट्यानाट्या केसेस करून प्रचारापासून अलिप्त ठेवण्याचे धोरण आखले जात आहे. यावर सखोल चौकशी करत कारवाई करण्याचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिले होते.
दिंद्रुड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीएसआय विजेंद्र नाचण यांना दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात दिंद्रुड पोलीस स्टेशनला शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्यासाठी नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या बाबींचा राग मनात धरून पीएसआय विठ्ठल शिंदे यांनी ५ जानेवारी रोजी दिलीप कोमटवार यांचा मुलगा अमित कोमटवार याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अन्यथा दिंद्रुड पोलीस स्टेशनसमोर बेमुदत उपोषण करण्याची व ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकऱ्यांनी निवेदनात दिला आहे. पीएसआय शिंदे हे काही लोकांसोबत राजकीय हितसंबंध जोपासत असून शिंदे यांचा फोन काॅलचा तपशील मागवून सखोल चौकशी करत कारवाईची तक्रार पोलीस अधीक्षकांना निवेदनकर्त्यांनी दिली आहे. १२७ ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
दिंद्रुडमध्ये राजकीय द्वेषातून पोलिसांना हाताशी धरून जुने वाद तसेच तेढ निर्माण करून लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम पीएसआय शिंदे करत आहे, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
- राम उबाळे, दिंद्रुड ग्रामस्थ
घडलेल्या घटनेनुसार अमित कोमटवार यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्यात कुठलीही खोटी तक्रार नसल्याची प्रतिक्रिया पीएसआय विठ्ठल शिंदे यांनी दिली आहे.