जिल्ह्यातील ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ लस दिली जाते. रविवारी जिल्ह्यात पोलिओ लसीकरणासाठी २३०० बुथचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ८८ लाभार्थी बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले. आता २ फेब्रुवारीपासून सर्वेक्षण करून जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३ दिवस तर शहरी भागात ५ दिवस कर्मचाऱ्यांकडून पोलिओ डोस घेतला असल्याची खात्री करत त्याबाबतची नोंद घेतली जाणार आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पोलिओ लसीकरण अभियान सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.
नाळवंडीत मुख्य कार्यक्रम
बीड तालुक्यातील नाळवंडी आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेला जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते चिमुकल्याला डोस देऊन सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, सहायक संचालक डॉ. सचिन देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, आरएमओ डॉ. बाबासाहेब ढाकणे, जि.प. सदस्य केशरताई घुमरे, सरपंच राधाकिशन म्हेत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा तरकसे, डॉ.सोनाली सानप आदींची उपस्थिती होती.