पोकरा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बीड : आत्मा कृषी विभाग बीड व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योगवाढीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांकरिता एकदिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे यांनी, शेतकऱ्यांना पोकरा प्रकल्पांतर्गत शेतकरी बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपनीकरिता कृषी प्रक्रिया उद्योग स्थापन्यासंदर्भात मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोकरा प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी अर्ज दाखल करण्याचे आव्हान केले.
कृषी विद्यापीठाचे डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी तुतीच्या विविध जाती व रेशीम कीटक संगोपनाचा उत्पादन खर्च कमी करून दर्जा टिकविण्यासाठी या उद्योगासंबंधीचे विविध देश व पारंपरिक राज्यातील कौशल्य आत्मासात करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. लटपटे म्हणाले, ‘रेशीम उद्योगात अळ्यांच्या कात टाकण्याच्या अवस्था व तुती लागवडीतील यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यामधील तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची माहिती नसल्याने उद्योगात अपयशी होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. चॉकीमुळे कोष मिळण्याची शाश्वती वाढते. इतर पारंपरिक देशात खासकरून चीनमध्ये चॉकीच्या साहाय्याने कोष उत्पादन घेण्यावर भर असल्याने त्यांच्या यशाचा आलेख आपल्यापेक्षा सरस दिसतो, याबाबत माहिती दिली.
रेशीम प्रक्रिया उद्योजक सचिन थोरात यांनी विपणन आणि प्रगतिशील शेतकरी संपत परळकर, सुदाम पवार यांनी स्वानुभव कथन केले.
प्रकल्प विशेषज्ञ कृषी आतिष चाटे यांनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी तांत्रिक बाबी व योजना समजावून सांगितल्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रकल्प सहायक आतिष चाटे, पी. डी. मुंडे, स्वप्निल कदम, गजानन तारळकर, जयशिव जगधने, राजकुमार मुंदडा, प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर, शेतीशाळा प्रशिक्षक केशव चाटे, पांडुरंग भंडारे, लेखा सहायक सुशील धावरे, रवि शिरसाट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली.
मराठवाड्यात पीक पद्धतीत बदलाची गरज
जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही. एस. पवार यांनी मराठवाड्यातील विविध पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. शेती किफायतीशीर करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय रेशीम उद्योग निश्चितच आर्थिक स्थर्य प्राप्त करून देऊ शकतो. कर्नाटकातील रामनगर येथील बाजारपेठेत रेशीम कोषास चांगला भाव मिळत असून, कोषाचे एखादे पीक गेले तरी वर्ष वाया जाण्याची भीती नाही. प्रत्येक शेतकऱ्याने दीड - दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून इतर पिकाच्या तुलनेत वर्षाकाठी रेशीम कोषाचे ६ ते ७ पीके घेण्याचे आवाहन त्यांनी केले.