गेल्या आठ दिवसांपासून ऊन आणि वारे सुटले होते, कडक उन्हाळ्यात होणारी पायपोळ पावसाळ्यात जाणवत होती. पेरणी, लागवड केलेल्यांना दुबार पेरणीची भीती वाटू लागली होती, तर काही शेतकऱ्यांनी तिफण सोडून दिली होती. मात्र, रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कामाला लावले. रात्री झालेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या शेताला संजीवनी मिळाली तर राहिलेल्या पेरणीसाठी उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, अजूनही मोठ्या पावसाचीच प्रतीक्षा आहे. झालेला पाऊस फक्त आधार झाला असून, शेतकरी चिंतामुक्त झाला, असे म्हणता येणार नाही.
शहरात तीन दिवसांनंतर कोरोनाबाधित रुग्ण
शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिरूर शहरात तीन दिवसांनंतर कोरोनाबाधित रुग्ण निघाला तर तालुक्यात बुधवारपेक्षा आकडा कमी झाला असून तो सतरा आहे. कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नसल्याने विशेष काळजी घेण्याचीच गरज आहे.
भुसार भावात घसरण
शिरूर कासार : भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी राखून ठेवलेला माल आता पुन्हा घाट्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे भुसार मालाचे भाव घसरल्याने दिसून येत आहे. पाच हजारांपर्यंत हरभरा होता तो आता साडेचार हजारांवर आल्याने शेतकरी राखून ठेवलेल्या मालात घाट्यात येऊ पाहतोय.
शहरात सखल भागात साचले डबके
शिरूर कासार : रात्री झालेल्या दमदार पावसाने शहरात सखल भागात पाण्याचे डबके साचल्याले चित्र दिसत होते. मात्र, दिवसभर उघड दिल्याने ते फार वेळ राहिले नाही. वापरासाठी पावसाचे पाणी काही ग्रामस्थांनी टिपाडात भरून ठेवले होते.
अजूनही पावशा ओरडतोय
शिरूर कासार : शेतकरी ज्या पक्षाला पावशा या नावाने ओळखतो तो पक्षी अजूनही ओरडत असल्याचा आवाज रानावनात कानी ऐकू येतो, पावशा ओरडला की पाऊस येतो, असा काही जुन्या माणसांचा समज आहे, हा पक्षी फक्त पावसाचेच थेंब वरच्या वर चोचीत घेऊन आपली तहान भागवतो, असेही मानले जाते.