माजलगाव : काही महिन्यांपासून शहरातील कचरा संकलित करून तो केसापुरी येथील घनकचरा प्रकल्पात आणला जातो. त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी तो २-३ दिवसांनी जाळला जातो. त्याच्या धुराच्या प्रदूषणामुळे व दुर्गंधीमुळे या प्रकल्पालगत असलेल्या तीन गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
माजलगाव नगरपालिका शहरातील कचरा गोळा करून तो सिंदफना नदीच्या काठी टाकण्यात येत असे. हा कचरा नदीकाठी टाकला जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष मीरा प्रकाश आनंदगावकर यांच्या काळात केसापुरी येथील पाच एकर जागेत घनकचरा प्रकल्प उभारण्याचे ठरले. त्यानंतर संरक्षक भिंत व सिमेंट रस्ते बांधण्यात आले. परंतु, या जागेत कचराच आणून टाकला जात नसे. तो कचरा सिंदफना नदीपात्राच्या काठी व बायपासला कोठेही टाकण्यात येत असे.
परंतु मागील ४-५ महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचा सर्व कचरा घनकचरा प्रकल्पात आणून टाकला जात आहे. तसेच दर दोन- तीन दिवसानंतर तो कचरा पेटविला जातो. हा जाळलेला कचरा धुमसत राहतो. त्यातून प्रदूषणयुक्त धूर व दुर्गंधी सुरूच राहते. परिणामी, या प्रकल्पालगत असलेल्या केसापुरी,भाटवडगाव व मंगरूळ या तीन गावांतील रहिवाशांना दुर्गंधी व प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे.
यामुळे अनेक नागरिकांना दमा, श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच प्रकल्पाच्या पश्चिमेला ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्र असून त्यासही एखाद्या वेळी धोका निर्माण होऊ शकतो. तर याच प्रकल्पाच्या समोरून खामगाव - पंढरपूर ५४८ सी हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तरीही याकडे नगरपालिकेचे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसत आहे.
घनकचरा प्रकल्प परिसरात दुर्गंधी व प्रदूषणाबाबत आम्ही अनेकवेळा नगरपालिकेकडे लेखी व तोंडी तक्रार केली. तरीदेखील नगरपालिका याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करताना दिसते. यापुढे या ठिकाणी कचरा जाळल्यास आम्ही हा प्रकल्प बंद करू - विलास साळवे,माजी सरपंच केसापुरी
घनकचरा प्रकल्पाबाबत संबंधित गुत्तेदाराला नगरपालिका नोटीस बजावणार आहे. तरीही त्याने न ऐकल्यास त्याचे टेंडर बंद करण्यात येईल.
-- शेख मंजुर, नगराध्यक्ष, माजलगाव.
===Photopath===
040321\img_20210302_163534_14.jpg