बीड : प्रत्येक मेडिकलवर फार्मासिस्ट असणे आवश्यक असते. परंतु अनेक ठिकाणी नौकरच औषधी देतात. असाच प्रकार बीडमधील वर्षा मेडिकलमध्ये घडला. यावर तक्रार करताच चौकशी करून या मेडिकलचा सहा दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे. औषध प्रशासनाने ही कारवाई केली. यामुळे मेडिकलधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील सुमनबाई हाटवटे यांना ४ जून रोजी डॉ.रविंद्र घुंबरे यांच्या रुग्णालयात दाखल केले हाेते. येथून त्यांना दोन औषधी लिहून दिले. शेषनारायण हाटवटे यांनी येथीलच वर्षा मेडिकलमधून औषधी खरेदी केली. हाटवटे हे आरोग्य विभागात कर्तव्यास असल्याने त्यांना गोळ्या बदलून दिल्याचे समजले. त्यांनी बील व फार्मासिस्टची विचारणा केली. यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. उलट घुंबरे यांनीच आपल्याला धमकी दिल्याची तक्रार औषध प्रशासनाला केली होती. त्यानंतर त्यांना नोटीस बजावून चौकशी केली. यात नौकराने औषधी देण्यासह बील न दिल्याचा ठपका ठेवत वर्षा मेडिकलचा २२ ते २७ डिसेंबर दरम्यान सहा दिवसांसाठी परवाना निलंबित केला. या कारवाईने असे चुकीचे प्रकार करणाऱ्या मेडिकलधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागरिकांनी तक्रार घेऊन पुढे यावे
मेडिकलधारकांनी चुकीचे औषधी देणे, बील न देणे, जास्त पैसे घेणे, फार्मासिस्ट नसणे, अस्वच्छता असणे आदी त्रुटी आढळल्या तर सामान्य नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची गरज आहे. एकही चुकीचे औषधी दिले गेले तर थेट आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
कोट
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली. यात वर्षा मेडिकलमधून चिठ्ठीवरील औषधी बरोबर न देणे आणि बील न देण्याचा ठपका ठेवत सहा दिवसांसाठी परवाना निलंबित केला. इतर ठोस पुरावे नसल्याने मोठी कारवाई करता आली नाही.
रामेश्वर रोईफोडे
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन बीड
कोट
चुकीचे औषधी दिल्याची तक्रार दिली. कारवाई झाल्याने समाधानी आहे. इतरांनी तरी यापुढे असे प्रकार करू नये. नागरिकांनीही काळजी घ्यावी. मी आरोग्य विभागात असल्याने मला हे समजले. परंतु मेडिकलधारकांनी सामान्यांची फसवणूक करू नये.
शेषनारायण हाटवटे
तक्रारदार, बीड