शिरूर कासार : कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केल्याने शिरूरमध्ये शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. नाराज असलेल्या व्यापाऱ्यांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली होती. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तहसीलदार श्रीराम बेंडे, नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप व पो.नि. सिद्धार्थ माने हे आपला फौजफाटा बरोबर घेऊन गस्त घालत होते.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता ऊद्रेक लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘लाॅकडाऊन’ हाच पर्याय असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला. व्यापारी नाराज होते, तसे निवेदन देऊन त्यांनी विरोधही दर्शवला होता. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य व आदेशाच्या उल्लंघनाचे परिणाम लक्षात घेता आदेशाचे अनुपालन करत दुकाने बंद ठेवली गेली. अत्यावश्यक सेवा तथा आदेशात दर्शवल्याप्रमाणे अन्य विहित वेळेत व्यवहार सुरू होते. गत वर्षी मार्चमध्येच ‘लाॅकडाऊन’ झाला होता. याही वर्षी त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ ‘कोरोना’ संक्रमनाने आणली आहे. मागील लाॅकडाऊनचा अनुभव लक्षात घेऊन आता लोकांनी सावध भूमिका स्वीकारली असल्याचे दिसून येत होते, रस्ते निर्मनुष्य दिसत होते. यामुळे मध्यम व सामान्य मोलमजुरी करणाऱ्यांना याची सर्वाधिक झळ बसणार असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
दोन ठिकाणी चेक पोस्ट
जिल्हाबंदी असताना अन्य जिल्ह्यांतून प्रवासी येऊ नयेत, तसेच त्यांना सीमेवरच रोखण्यासाठी मानूर व तिंतरवणी याठिकाणी चेकपोस्ट तैनात केले आहे. कुठलीही सबब ऐकून न घेता प्रवेशबंदी अमलात आणली जात असल्याचे सांगितले गेले.
मंदिराचे दरवाजे रात्रीच बंद
आदेशाचे पालन करत येथील सिद्धेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार गुरुवारी रात्रीच ११ वाजता महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी कुलूप लावून बंद केले, तसेच पुढील आदेशापर्यत मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले.
त्यावेळी कालिकादेवी मंदिरदेखील विश्वस्थ मंडळाने बंद केले. संस्थानचे अध्यक्ष रोहिदास पाटील, उपाध्यक्ष गोविंद पाटील, सचिव लक्ष्मणराव गाडेकर, सदस्य गोपीचंद गाडेकर व अन्य विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत मंदिर बंद करण्यात आले.
===Photopath===
260321\img20210325222611_14.jpg~260321\vijaykumar gadekar_img-20210326-wa0017_14.jpg
===Caption===
शिरूर येथील सिद्धेश्र्वर मंदिर तसेच कालिका देवी मंदिर रात्रीच बंद करण्यात आले आहे ,शहरातील रस्ते सामसुम व दुकाने बंदच होत्या.