आष्टी तालुक्यातील घटना, तपासणीसाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत
आष्टी (जि. बीड) : तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड तालुक्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. मृत्यू झालेल्या कावळ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आष्टी तालुक्यातील शिरापूर येथेही शेकडो कोंबड्या मरण पावल्या आहेत. ४ ते ५ दिवसांपासून सराटे वडगाव येथील शेतकऱ्यांकडील व पोल्ट्रीमधील १०० पक्षी व २ कावळ्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रविवारी पशुवैद्यकीय पथक दाखल झाले असता घटनास्थळी १६ कोंबड्या मृत आढळून आल्या. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव येथे १६ जानेवारी रोजी एक तर १७ रोजी एक असे एकूण २ कावळे मृत झाल्याची घटना घडली आहे. तर रावसाहेब मल्हारी गजघाट यांच्या पोल्ट्रीमधील १६ कोंबड्या मरण पावल्या आहेत. बापूराव गायकवाड यांच्या पोल्ट्रीतील १० ते १२ कोंबड्या अचानक मरण पावल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय पथकाचे डॉ.एस.के.गदादे, डाॅ.एस.डी.शिंदे, सहायक परिचर वांढेकर, सहाय्यक परिचर चौधरी यांचे पथक व सरपंच राम बोडखे दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. या मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गावामध्ये मागील आठ दिवसांपासून कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. १६ व १७ रोजी एकूण २ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. गावातील शेतकरी व पोल्ट्रीफार्ममधील जवळपास १०० पेक्षा जास्त पक्षी मृत झाले आहेत.
- राम बोडखे, सरपंच सराटे वडगाव - आनंदवाडी
सराटे वडगाव येथील शेतकरी रावसाहेब गजघाट यांच्या पोल्ट्रीमधील १६ कोंबड्या मृत आढळून आल्या असून, या कोंबड्यांचे नमुनेे पुणे येथील प्रादेशिक विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
- डॉ.एस.के.शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी